नांदेड : जिल्ह्यात अवैध गोवंश वाहतुकीविरोधात सुरू असलेल्या ‘ऑपरेशन क्रॅक डाऊन’ मोहिमेंतर्गत अर्धापूर व मुदखेड पोलिसांनी संयुक्तरीत्या मोठी कारवाई

नांदेड : जिल्ह्यात अवैध गोवंश वाहतुकीविरोधात सुरू असलेल्या ‘ऑपरेशन क्रॅक डाऊन’ मोहिमेंतर्गत अर्धापूर व मुदखेड पोलिसांनी संयुक्तरीत्या मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत अवैधरीत्या वाहतूक केली जाणारी तब्बल ३५ गोवंश जनावरे जप्त करण्यात आली असून एकूण ६ लाख ७४ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या प्रकरणी चार आरोपींविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलीस अधीक्षक कार्यालयातून दिलेल्या माहितीनुसार, अर्धापूर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम तसेच प्राण्यांविषयी क्रूरतेस प्रतिबंध अधिनियमांतर्गत गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. पोलिसांनी २१ मे ते २६ मे दरम्यान गुप्त माहितीच्या आधारे इंदिरानगर, आंबेडकर चौक आणि नागेली (अर्धापूर) परिसरात सापळे रचून ही कारवाई केली. जप्त केलेल्या ३५ जनावरांची अंदाजे किंमत ६ लाख ७४ हजार रुपये आहे. या प्रकरणात जावेद खान बाबू खान, जमील खान बंडे (रा. इंदिरानगर, अर्धापूर), असलम उल्ला खान अब्दुल्ला खान (रा. पविनानगर, अर्धापूर) आणि रोहेल्ला खान नोव्हाब खान यांच्यावर गुन्हे दाखल झाले असून पोलीस उपनिरीक्षक चित्तरंजन डेमकेवाढ व पोलीस शिपाई शिवराज राठोड पुढील तपास करत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तसेच अपर पोलीस अधीक्षक अश्विनी पाटील आणि मुदखेड विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अनुराग जैन यांच्या सूचनेनुसार विशेष पथके कार्यरत होती. कारवाई यशस्वी करण्यासाठी पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम, पोलीस उपनिरीक्षक धीरज चव्हाण, पोलीस अंमलदार शिवमल्हार पाटील, पांडुरंग व अर्धापूर पोलीस ठाण्याच्या पथकाने विशेष परिश्रम घेतले.

COMMENTS