बीड जिल्ह्यात लाचखोरीचे वाढते प्रमाण पुन्हा एकदा उघड झाले असून आष्टी येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) धडक कारवाई करत महावितरणच्या महिला स

बीड जिल्ह्यात लाचखोरीचे वाढते प्रमाण पुन्हा एकदा उघड झाले असून आष्टी येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) धडक कारवाई करत महावितरणच्या महिला सहाय्यक अभियंत्याला रंगेहात पकडले आहे. या घटनेमुळे महावितरण विभागात एकच खळबळ उडाली आहे.
आष्टी येथील महावितरण कार्यालयात कार्यरत असलेल्या सहाय्यक अभियंता कोमल अर्जुन शिंदे यांनी तक्रारदाराकडून सौर ऊर्जा प्रकल्पाचे ऑडिट पूर्ण करून निधी मंजुरी (फंड रिलीज) करण्यासाठी 18 हजार रुपयांची लाच मागण्यात आली होती.या मागणीबाबत तक्रारदाराने एसीबीकडे धाव घेत तक्रार नोंदवली.तक्रारीची शहानिशा केल्यानंतर एसीबीने सापळा रचला. त्यानुसार दुपारी सुमारे 2 वाजण्याच्या सुमारास लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकाने कोमल शिंदे यांना रंगेहात ताब्यात घेतले.या कारवाईत पोलीस उपाधीक्षक सोपान चितमपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी खरसाडे, बीडकर व पुरी यांनी सहभाग घेतला. पुढील गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असून तपास सुरू आहे. दरम्यान, बीड जिल्ह्यात सातत्याने उघड होणार्या लाचखोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. शासकीय कार्यालयांमध्ये कामासाठी पैसे मागितले जात असल्याच्या तक्रारी वाढत असून, अशा कारवायांमुळे प्रशासनातील भ्रष्टाचार पुन्हा चर्चेत आला आहे.
लाचखोरी सहन केली जाणार नाही
शासकीय कामासाठी कोणत्याही अधिकार्याने लाच मागितल्यास नागरिकांनी तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा. तक्रारदाराची ओळख गोपनीय ठेवली जाते आणि अशा प्रकरणांमध्ये कठोर कारवाई केली जाते, असे आवाहन एसीबीकडून करण्यात आले आहे.
नागरिकांमध्ये रोष
आष्टीसह बीड जिल्ह्यातील विविध विभागांमध्ये वाढत्या लाचखोरीमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत.सरकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी पैसे मोजावे लागतात, ही अत्यंत गंभीर बाब आहे. दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी शिवसंग्राम चे तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर चौधरी मागणी केली आहे.

COMMENTS