शिरूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या धडक देऊन पळून जाण्याच्या गंभीर अपघात प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. तब्बल 15 दिवस विविध सीस

शिरूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या धडक देऊन पळून जाण्याच्या गंभीर अपघात प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. तब्बल 15 दिवस विविध सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून पोलिसांनी आरोपीसह चारचाकी वाहन ताब्यात घेतले आहे.
दि. 28 एप्रिल 2026 रोजी पहाटे सुमारे 5.25 वाजण्याच्या सुमारास शिरूरहून बीडकडे जाणार्या रस्त्यावर येळम फाटा येथे हा अपघात घडला होता. शिरूर येथील नामांकित मुकादम (कंत्राटदार) शिवाजी संपत कदम (वय 61) हे सकाळी वॉकिंग करत असताना अज्ञात पांढर्या रंगाच्या चारचाकी वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. वाहनचालकाने धडक दिल्यानंतर घटनास्थळावरून पलायन केले. या भीषण अपघातात शिवाजी कदम यांचा जागीच मृत्यू झाला होता. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 74/2026 अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम 281, 125 (अ), 125 (ब), 106 (1) तसेच मोटार वाहन कायद्यान्वये कलम 134, 177 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार 1245 सुरवसे यांच्याकडे सोपविण्यात आला होता. तपासादरम्यान पोलिसांनी घटनास्थळ परिसरासह बीडकडे आणि अहिल्यानगरकडे जाणार्या मार्गांवरील विविध सीसीटीव्ही कॅमेर्यांचे फुटेज बारकाईने तपासले. अखेर तपासातून आरोपी रामेश्वर दत्तात्रय मोकाशी (वय 36, रा. हनुमंत पिंपरी, ता. केज, जि. बीड) याची ओळख पटली. त्यानंतर पोलिसांनी केज येथून आरोपीसह संबंधित चारचाकी वाहन ताब्यात घेतले. ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कावत, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी बाळकृष्ण हानपुडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या तपास पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रविण जाधव, पोलीस हवालदार सुरवसे, डिडुळ, नांगरे आणि पोलीस अंमलदार विधाते यांचा सहभाग होता.

COMMENTS