नवगण राजुरी : येथील गजानन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात आणि आनंदमय वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्र

नवगण राजुरी : येथील गजानन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात आणि आनंदमय वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य प्रशांत पवळ होते.
महाराष्ट्र दिनानिमित्त शाळेच्या प्रांगणात ध्वजारोहणाचा सोहळा प्राचार्य पी. एस. पवळ यांच्या हस्ते पार पडला. ध्वजारोहणानंतर सर्व उपस्थितांनी राष्ट्रगीत गायन करून महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेला अभिवादन केले. यानंतर महात्मा गांधी तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान एन. एम. एम. एस. तसेच नवोदय विद्यालय पात्रता परीक्षेत यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष गौरव करण्यात आला. या विद्यार्थ्यांना गुणपत्रक व प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. त्यांच्या यशाबद्दल उपस्थित शिक्षक व पालकांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी प्राचार्य प्रशांत पवळ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना महाराष्ट्र दिनाचे महत्त्व, राज्याचा इतिहास तसेच विद्यार्थ्यांनी शिक्षणात सातत्य ठेवून उज्ज्वल भविष्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले. कार्यक्रमास विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडला.

COMMENTS