Homeताज्या बातम्या

पुरोहितांनी गावाला जेऊ घातला ‘धोंडा’; गुहा येथे धार्मिक एकात्मतेचा अनोखा संदेश

देवळाली प्रवरा : अधिक मासानिमित्त गुहा (ता. राहुरी) येथे ग्रामपुरोहितांच्या दातृत्वातून धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांची अनोखी मेजवानी अन

तनपुरवाडी येथील नदीचे लोकवर्गणीतून खोलीकरण; सरकारी मदतीशिवाय ग्रामस्थांचा स्तुत्य उपक्रम
डॉ. व्ही. व्ही. पोपेरे यांना ‘राष्ट्रीय कर्तव्य सन्मान’ पुरस्कार; अभिनेत्री अमिषा पटेल यांच्या हस्ते गौरव
शेवगावात हिंदू जनआक्रोश मोर्चा; अत्याचार प्रकरणाचा निषेध करत अन्यायग्रस्त कुटुंबाला न्याय देण्याची मागणी

देवळाली प्रवरा : अधिक मासानिमित्त गुहा (ता. राहुरी) येथे ग्रामपुरोहितांच्या दातृत्वातून धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांची अनोखी मेजवानी अनुभवायला मिळाली. श्री विष्णूसहस्त्रनाम पठण, त्रिदिनी अकरा कुंडी श्रीविष्णू याग, १०८ दाम्पत्यांना अन्नदान व वाणदान, शेकडो साधकांना धार्मिक पर्यटन तसेच ‘गाव धोंडा’ अशा विविध उपक्रमांमुळे संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले. विशेष म्हणजे सर्व जाती-धर्मातील हजारो ग्रामस्थांनी धोंड्याच्या मिष्ठान्न भोजनाचा आस्वाद घेत धार्मिक एकात्मतेचा संदेश दिला.

ग्रामपुरोहित सोमनाथ काशिनाथ कुलकर्णी यांनी अधिक मासातील दानधर्माचे महत्त्व स्वतःच्या कृतीतून अधोरेखित केले. त्यांच्या पत्नी सीमा, मुलगा सोहम व मुलगी संस्कृती यांनीही सर्व धार्मिक विधी व उपक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

गुहा येथे १८ ते २० मे दरम्यान स्वखर्चाने त्रिदिनी अकरा कुंडी श्रीविष्णू याग करण्यात आला. यावेळी १०८ दांपत्यांना अन्नदान व धोंड्याचे वाण देण्यात आले. तसेच २१ व २२ मे रोजी शेकडो साधकांना लक्झरी बसेसमधून शेगाव येथे धार्मिक पर्यटन घडविण्यात आले. सोमवारी (दि. २५) आयोजित गाव धोंडा कार्यक्रमात हभप संकेत शास्त्री यांचे काल्याचे कीर्तन, दहीहंडी उत्सव व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. सांगता प्रसंगी पुरणाचा धोंडा व त्यावर साजूक तुपाची धार असा मिष्ठान्न भोजनाचा खास बेत ग्रामस्थांच्या विशेष पसंतीस उतरला.

“ग्रामपुरोहित सोमनाथगुरु कुलकर्णी यांनी दुसऱ्यांदा गाव धोंडा घातला. स्वखर्चाने धार्मिक विधी व उपक्रम राबविताना त्यांची दानशूर वृत्ती दिसून येते. असे ग्रामपुरोहित गावाला लाभणे, हे आमचे भाग्य आहे.” – अशोक उर्‍हे (ग्रामस्थ, गुहा)

“गाव धोंड्याच्या भोजनासाठी सर्व ग्रामस्थांना निमंत्रण असते. त्यामुळे सर्व जाती-धर्मातील लोक एकत्र येतात आणि धार्मिक भेदाच्या भिंती दूर होतात.” – सादिक सय्यद (माजी उपसरपंच, गुहा)

COMMENTS