Homeताज्या बातम्या

भिंत अंगावर कोसळून चिमुरडीचा मृत्यू; रतनवाडीमधील घटना, आई गंभीर जखमी

अकोले : तालुक्यातील आदिवासी दुर्गम भागातील रतनवाडी येथे सोमवारी ३ ऑगस्ट रोजी मध्यरात्री घडलेल्या अत्यंत हृदयद्रावक घटनेने संपूर्ण तालुका हादरला.

४४ वर्षांनंतर सहस्त्रकुंड येथे भगवान परशुराम मूर्तीची पुनःप्रतिष्ठापना; तीर्थक्षेत्र विकासाला मिळणार वेग
माळशेज घाटातील रस्ता खचल्याने पुणे-मुंबई वाहतूक पूर्णपणे बंद; प्रशासनाचा महत्त्वाचा निर्णय
पालघर, वसई-विरारमध्ये मुसळधार पावसाने हाहाकार; नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, साचलेल्या पाण्यात कार घुसून अपघात

अकोले : तालुक्यातील आदिवासी दुर्गम भागातील रतनवाडी येथे सोमवारी ३ ऑगस्ट रोजी मध्यरात्री घडलेल्या अत्यंत हृदयद्रावक घटनेने संपूर्ण तालुका हादरला. राहत्या घराची दगडी भिंत अचानक अंगावर कोसळून अवघ्या आठ महिन्यांच्या सृष्टी अशोक झडे या निष्पाप चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर तिची आई सोनाली अशोक झडे ही गंभीर जखमी झाली आहे.

रविवारी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास झडे कुटुंब आपल्या घरात गाढ झोपलेले असताना घराच्या पश्चिम बाजूची जुनी भिंत अचानक कोसळली. दुर्घटनेमध्ये अंथरुणावर झोपलेल्या सृष्टीच्या अंगावर मोठे दगड आणि मातीचा ढिगार पडल्यामुळे ती गंभीर जखमी झाली. तिची आई सोनाली हिलासुद्धा या दुर्घटनेमध्ये गंभीर दुखापत झाली. घटनेनंतर ग्रामस्थांनी तातडीने मदतकार्य सुरू करून मायलेकीला बाहेर काढले आणि उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय राजूर येथे दाखल केले; मात्र डॉक्टरांनी सृष्टी हिला मृत घोषित केले. सोनाली यांच्या हाताला फ्रॅक्चर असून शरीरावर अनेक ठिकाणी गंभीर जखमा झाल्या आहेत. घटनेची राजुर पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास एपीआय किशोर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय परसराम तागड, पो.कॉ. श्रीकांत नरोडे, संभाजी सांगळे आणि विनायक कोकणे करीत आहेत.

आ. डॉ. किरण लहामटे यांनी केले सांत्वन

अकोले तालुक्यातील आदिवासी दुर्गम भागात मुसळधार पाऊस आणि सततच्या अतिवृष्टीमुळे अनेक कच्ची व दगडी घरे धोकादायक बनली असून काही घरांची पडझड झाली आहे. अशा परिस्थितीत रतनवाडीतील ही दुर्घटना घडल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आठ महिन्यांच्या निष्पाप सृष्टीचे आयुष्य सुरू होण्यापूर्वीच, आईच्या कुशीत सुखाने झोपलेले असताना तिचा क्षणार्धात मृत्यू झाल्यामुळे झडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. या घटनेमुळे संपूर्ण अकोले तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. प्रशासनाकडून या कुटुंबाला आर्थिक मदत मिळेल, उपचाराची व्यवस्था होईल; मात्र निष्पाप चिमुकलीचा गेलेला जीव कोण परत आणणार, असा सवाल आता उपस्थित होत आहे. या वेळी आ. डॉ. किरण लहामटे यांनी दवाखान्यात जाऊन कुटुंबाचे सांत्वन केले.

COMMENTS