असर्जन येथील धक्कादायक घटना; दोन अल्पवयीन ताब्यात नांदेड : नांदेड जिल्ह्यातील असर्जन येथील शंकररावजी चव्हाण विद्यालयात सोमवारी (३ ऑगस्ट) सकाळी
असर्जन येथील धक्कादायक घटना; दोन अल्पवयीन ताब्यात

नांदेड : नांदेड जिल्ह्यातील असर्जन येथील शंकररावजी चव्हाण विद्यालयात सोमवारी (३ ऑगस्ट) सकाळी विद्यार्थ्यांमधील वादाचे हिंसक रूप धारण करत दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकूने हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात विद्यार्थी गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर विष्णुपुरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी सुमारे १०.२० वाजण्याच्या सुमारास इयत्ता दहावीतील महावीर गोविंद धुमाळ (वय १६, रा. धुमाळवाडी) याचा त्याचे दोन वर्गमित्र यांच्याशी शाळेच्या परिसरात वाद झाला. त्यानंतर तिघेही शाळेजवळील शिवगणेश मंदिरामागील परिसरात गेले. तेथे दोन्ही विद्यार्थ्यांनी महावीर धुमाळ याच्यावर चाकूने हल्ला केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात त्याच्या गळ्यावर, पोटावर तसेच शरीराच्या इतर भागांवर गंभीर जखमा झाल्या.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत दोन्ही अल्पवयीन संशयितांना ताब्यात घेतले. घटनास्थळावरून चाकूही जप्त करण्यात आला आहे. जखमी विद्यार्थ्याला त्वरित विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे.
घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा केला असून पुरावे संकलित करण्यासाठी मोबाईल फॉरेन्सिक पथकाचीही मदत घेण्यात आली. विष्णुपुरी रुग्णालयात खबरदारीचा उपाय म्हणून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.
शालेय सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
शाळेतील विद्यार्थ्यांमधील किरकोळ वाद इतक्या टोकाला जाऊन चाकूहल्ल्यात परिवर्तित झाल्याने पालक, शिक्षक आणि नागरिकांमध्ये तीव्र चिंता व्यक्त होत आहे. शैक्षणिक परिसरात शस्त्रासह प्रवेश कसा झाला, विद्यार्थ्यांमधील वाढती आक्रमकता कशी रोखायची आणि शाळांमधील समुपदेशन व सुरक्षा व्यवस्था अधिक प्रभावी करण्याची गरज या प्रश्नांवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. ही घटना जिल्ह्यातील शालेय सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत गंभीर मानली जात आहे.

COMMENTS