Homeताज्या बातम्या

काठोडा येथे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे कायदेविषयक जनजागृती शिबिरग्रामीण नागरिकांना कायदेशीर हक्कांची माहिती; महिला, बालक आणि ऊसतोड कामगारांच्या हक्कांवर विशेष मार्गदर्शन

बीड : ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या कायदेशीर हक्कांची जाणीव करून देणे तसेच कायद्याचे संरक्षण समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याच्या

टाकीत उतरलेल्या चार सफाई कर्मचार्‍यांचा मृत्यू
कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांवर सकारात्मक चर्चा15 तारखेपर्यंत अर्ज निकाली काढण्याचे आश्वासन
बीड बीडीओंचा मनमानी कारभारकामगार न्यायालयाच्या निकालाची अंमलबजावणी रखडली; हक्काच्या पैशांसाठी ग्रामपंचायत शिपायाचे ’प्राणांतिक उपोषण’ सुरू


बीड : ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या कायदेशीर हक्कांची जाणीव करून देणे तसेच कायद्याचे संरक्षण समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, बीड यांच्या वतीने काठोडा येथे विशेष कायदेविषयक जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष मा. दिनेश पी. सुराणा यांच्या तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव डॉ. वहाब ए. सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली 18 जून रोजी सकाळी 9 वाजता हा उपक्रम राबविण्यात आला.
शिबिराला जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अधिकार मित्र मिथुन जोगदंड, मिर्झा वजीर इब्राहिम, तत्वशील कांबळे, कर्मचारी कमलेश देशमुख व सुहास इंगोले यांची उपस्थिती लाभली. ग्रामपंचायत कार्यालय, जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी आणि सार्वजनिक सभागृह अशा प्रमुख ठिकाणी जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात अधिकार मित्र मिथुन जोगदंड यांनी ग्रामीण भागात कायदेशीर साक्षरतेचे महत्त्व अधोरेखित केले. अनेकदा कायद्याची माहिती नसल्यामुळे सामान्य नागरिक, महिला, कष्टकरी व दुर्बल घटकांना अन्याय सहन करावा लागतो किंवा शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घेता येत नाही. त्यामुळे कायद्याचे ज्ञान न्यायालयांच्या चौकटीबाहेर जाऊन थेट लोकांपर्यंत पोहोचणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचा ‘अधिकार मित्र’ उपक्रम समाजातील शेवटच्या घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे. महिलांची सुरक्षितता, गोपनीयतेचे संरक्षण, गरजू नागरिकांना नालसाच्या माध्यमातून मोफत कायदेशीर मदत उपलब्ध करून देणे तसेच ऊसतोड कामगारांना त्यांच्या हक्कांविषयी जागरूक करणे ही या उपक्रमाची प्रमुख उद्दिष्टे आहेत.शिबिरात बालक आणि महिलांच्या सुरक्षेवर विशेष भर देण्यात आला. अधिकार मित्र मिर्झा वजीर इब्राहिम यांनी महिलांचे अधिकार, त्यांच्यासाठी उपलब्ध असलेल्या कायदेशीर तरतुदी, विविध हेल्पलाईन सेवा आणि बालकांच्या संरक्षणासंबंधी माहिती दिली. बालकांना कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास चाइल्ड हेल्पलाईन क्रमांक 1098 वर संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी कमलेश देशमुख यांनी राष्ट्रीय विधी मदत प्राधिकरणाच्या (नालसा) माध्यमातून उपलब्ध असलेल्या मोफत आणि सुलभ कायदेशीर मदतीची माहिती दिली. राष्ट्रीय विधी मदत हेल्पलाईन क्रमांक 15100 विषयी जनजागृती करण्यात आली. तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या विविध मोफत योजनांची माहिती नागरिकांना देण्यात आली. गावातील प्रमुख सार्वजनिक ठिकाणी हेल्पलाईन क्रमांकाचे फलक लावून त्याची व्यापक प्रसिद्धी करण्यात आली. अधिकार मित्र तत्वशील कांबळे यांनी महाराष्ट्रातील ऊसतोड कामगारांच्या समस्या, त्यांचे कायदेशीर हक्क आणि शासनाच्या विविध योजनांविषयी मार्गदर्शन केले. कामाच्या ठिकाणी होणारी छेडछाड, गैरवर्तणूक किंवा अन्यायाविरोधात तक्रार करण्याचा अधिकार कामगारांना असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच एकल महिलांना मिळणार्‍या योजनांचा लाभ घेण्यासाठी येणार्‍या अडचणी दूर करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. ऊसतोड, बांधकाम आणि इतर असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या ओळखपत्रांबाबतही माहिती देण्यात आली. या शिबिराला सरपंच सुनिता सोमनाथ गिते, ग्रामविकास अधिकारी पुष्पराज इनकर, अरुण नाना डाके, बाळासाहेब डाके, आरोग्य साथी हर्षदा वाघमारे यांच्यासह गावातील महिला, युवक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या या उपक्रमामुळे ग्रामीण भागात कायद्याविषयी सकारात्मक जनजागृती निर्माण झाली असून, नागरिकांनी या उपक्रमाचे उत्स्फूर्त स्वागत केले. कायद्याचे ज्ञान आणि मोफत विधी सहाय्याची माहिती तळागाळापर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने हे शिबिर उपयुक्त ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

COMMENTS