अनुसूचित जातींच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरण (अबकड) निर्णयाविरोधात बीड ते मुंबई निघालेल्या पायी लाँग मार्चदरम्यान गुरुवारी (दि. 18) रांजणगाव (ता. शि

अनुसूचित जातींच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरण (अबकड) निर्णयाविरोधात बीड ते मुंबई निघालेल्या पायी लाँग मार्चदरम्यान गुरुवारी (दि. 18) रांजणगाव (ता. शिरूर, जि. पुणे) येथे तणावपूर्ण घटना घडली. मोर्चाच्या मार्गात वारंवार अडथळा निर्माण करणार्या एका रिक्षाचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतल्याने परिसरात काही काळ खळबळ उडाली.
मिळालेल्या माहितीनुसार, उपवर्गीकरणविरोधी लाँग मार्च रांजणगाव परिसरातून पुढे सरकत असताना संबंधित रिक्षाचालकाने मोर्चासोबत असलेल्या वाहनांच्या मार्गात वारंवार येत व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. या प्रकारामुळे मोर्चेकर्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक आंबेडकरी कार्यकर्ते आणि पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत संबंधित रिक्षाचालकाचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. सध्या पोलिसांकडून त्याची चौकशी सुरू असून घटनेमागील कारणांचा तपास करण्यात येत आहे. लाँग मार्चचे मुख्य संयोजक सिद्धार्थ शिनगारे, अजय सरवदे, प्रेम कांबळे आणि संदीप जाधव यांनी सांगितले की, संबंधित रिक्षाचालक मोर्चासोबत असलेल्या आयशर टेम्पोच्या पुढे वारंवार येत होता. तसेच वाहनचालकाशी असभ्य वर्तन करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. संबंधित रिक्षेची समोरील काच फुटलेली होती आणि चालक हातात लाकडी दांडे घेऊन संशयास्पद हालचाली करत असल्याचा दावाही संयोजकांनी केला आहे. या घटनेची सखोल चौकशी करून सत्य परिस्थिती समोर आणावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. हा प्रकार केवळ अपघाती होता की आंदोलनात अडथळा आणण्यासाठी नियोजित प्रयत्न होता, याचीही चौकशी व्हावी, असे त्यांनी म्हटले आहे. सामाजिक सलोखा बिघडविण्याचा प्रयत्न करणार्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. दरम्यान, अनुसूचित जातींच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाविरोधातील बीड ते मुंबई पायी लाँग मार्चला राज्यभरातून पाठिंबा मिळत असून, रांजणगावातील घटनेनंतर आंदोलनकर्त्यांनी अधिक जोमाने आणि निर्धाराने आपला लढा सुरू ठेवण्याचा संकल्प व्यक्त केला आहे.

COMMENTS