Homeताज्या बातम्या

जेव्हा दोन पद्मश्रींची भेट होते! राहीबाई पोपेरे आणि भिकल्या धिंडा यांची भेट; परस्परांकडून गौरव

अकोले : आदिवासी क्रांती दिनानिमित्त मुंबई येथे आयोजित सामाजिक कार्यक्रमात पद्मश्री पुरस्कारप्राप्त बीजमाता राहीबाई सोमा पोपेरे आणि प्रसिद्ध तारपा

विद्यार्थी आंदोलनात लाठीचार्जचा आदेश कोणी दिला? खासदार राहुल गांधींचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना पत्राद्वारे सवाल
सालेवडगावमध्ये कृषीदूतांचे उत्साहात स्वागत
जगप्रसिद्ध रांजणखळग्यांचा रस्ताच खाचखळग्यात

अकोले : आदिवासी क्रांती दिनानिमित्त मुंबई येथे आयोजित सामाजिक कार्यक्रमात पद्मश्री पुरस्कारप्राप्त बीजमाता राहीबाई सोमा पोपेरे आणि प्रसिद्ध तारपा वादक पद्मश्री भिकल्या धिंडा यांची भेट झाली. आदिवासी समाजासाठी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या या दोन्ही व्यक्तिमत्त्वांच्या भेटीमुळे उपस्थितांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

यावेळी भिकल्या धिंडा यांनी राहीबाई पोपेरे यांच्या बीजसंकलन, गावरान बियाण्यांचे संवर्धन आणि प्रसाराच्या कार्याचे कौतुक केले. तर राहीबाई यांनी भिकल्या धिंडा यांच्या तारपा वादनाच्या माध्यमातून आदिवासी संस्कृती आणि पारंपरिक वाद्यकलेच्या जतनासाठी सुरू असलेल्या कार्याबद्दल गौरवोद्गार काढले.

शिक्षण घेण्याची संधी मिळाली नसली तरी आपल्या आवडीच्या क्षेत्रात सातत्याने काम केल्यास समाजात वेगळी ओळख निर्माण करता येते, यावर दोघांचेही एकमत झाले. भिकल्या धिंडा यांनी तारपा वाद्याच्या माध्यमातून आपल्या पारंपरिक कलेची अनेक वर्षे सेवा केली. त्याचप्रमाणे राहीबाई पोपेरे यांनी गावरान बियाण्यांचे संवर्धन आणि आदिवासी शेतीपरंपरेच्या जतनासाठी केलेल्या कार्याची माहिती यावेळी देण्यात आली.

राहीबाई पोपेरे यांनी भिकल्या धिंडा यांची भेट घेण्याची इच्छा यापूर्वी अनेकदा व्यक्त केली होती. आदिवासी क्रांती दिनाच्या निमित्ताने ही भेट घडून आल्याने दोघांनीही आनंद व्यक्त केला. यावेळी भिकल्या धिंडा यांनी तारपा वादन सादर केले. तारपा संगीताचा आनंद घेताना राहीबाई यांनी त्यांच्या बालपणी आदिवासी समाजातील सण, उत्सव आणि विवाह सोहळ्यांमध्ये या पारंपरिक वाद्याला असलेले महत्त्व सांगितले.

आधुनिक डीजे संस्कृतीमुळे पारंपरिक आदिवासी वाद्ये आणि कलाप्रकार मागे पडत असल्याची खंतही यावेळी व्यक्त करण्यात आली. आदिवासी संस्कृती, पारंपरिक कला, शेतीपद्धती आणि स्थानिक ज्ञानाचे जतन करण्यासाठी नव्या पिढीने पुढाकार घेण्याची गरज असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

पद्मश्री पुरस्काराने सन्मानित झालेल्या या दोन्ही व्यक्तिमत्त्वांची एकत्रित भेट आदिवासी समाजासाठी विशेष ठरली. आपल्या कार्यातून आदिवासी संस्कृतीची ओळख देशपातळीवर पोहोचविणाऱ्या राहीबाई पोपेरे आणि भिकल्या धिंडा यांच्या भेटीचे उपस्थितांनी स्वागत केले.

COMMENTS