Homeताज्या बातम्या

कोचिंग क्लासेसच्या विळख्यात कनिष्ठ महाविद्यालये; शिक्षणाचा बाजार आणि प्रशासनाचे मौन!नामधारी कॉलेजांचा सुळसुळाट, गुणवत्तापूर्ण महाविद्यालये मात्र विद्यार्थ्यांविना; शिक्षण व्यवस्थेतील गंभीर संकटाकडे शिक्षण विभागाचे  दुर्लक्ष

नांदेड : शहरातील कनिष्ठ महाविद्यालयांच्या प्रवेश प्रक्रियेकडे पाहिले तर शिक्षण क्षेत्रात एक वेगळेच वास्तव उघड होत आहे. ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया अध

परळीतील ’त्या’ मृत्यूचे गूढ उकलले; पैशांच्या वादातून मित्रांनीच केला खूनस्थानिक गुन्हे शाखे कडून 48 तासांत आरोपी जेरबंद
सालेवडगावमध्ये कृषीदूतांचे उत्साहात स्वागत
राडी येथे खेती बचाव अभियानाचा शुभारंभ; शेतकर्‍यांना आधुनिक शेती तंत्रज्ञानाचे मार्गदर्शन


नांदेड : शहरातील कनिष्ठ महाविद्यालयांच्या प्रवेश प्रक्रियेकडे पाहिले तर शिक्षण क्षेत्रात एक वेगळेच वास्तव उघड होत आहे. ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया अधिकृतपणे सुरू होण्यापूर्वीच काही स्वयंसाहाय्यर्थ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये जागा भरल्याचे चित्र दिसत आहे. विशेष म्हणजे या महाविद्यालयांची शैक्षणिक गुणवत्ता, प्रयोगशाळा, प्राध्यापकांची उपलब्धता किंवा भौतिक सुविधा यापैकी कोणतीही बाब विद्यार्थ्यांच्या पसंतीमागे कारण नसून त्यामागे कोचिंग क्लासेस आणि कनिष्ठ महाविद्यालयांच्या टाय-अपचे जाळे कार्यरत असल्याची चर्चा शिक्षण क्षेत्रात सुरू आहे.
शहरातील अनेक नामांकित शिक्षण संस्थांनी सुवर्णमहोत्सवी वाटचाल पूर्ण केली आहे. दशकानुदशके गुणवत्तापूर्ण शिक्षण देणार्‍या या महाविद्यालयांकडे मात्र विद्यार्थी फिरकत नसल्याचे चित्र आहे. दुसरीकडे नुकतीच सुरू झालेली किंवा केवळ कागदोपत्री अस्तित्वात असलेली काही स्वयंसाहाय्यर्थ महाविद्यालये पूर्ण क्षमतेने भरल्याचे दिसत आहे. परिणामी गुणवत्तापूर्ण महाविद्यालयांतील प्राध्यापक, कर्मचारी आणि संस्थाचालकांसमोर अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामागील वास्तव अधिक धक्कादायक आहे. शहरातील काही मोठ्या कोचिंग क्लासेसनी दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना उन्हाळी वर्गांपासूनच आपल्या जाळ्यात ओढण्यास सुरुवात केली. प्रवेश प्रक्रिया सुरू होण्याआधीच विद्यार्थ्यांची नोंदणी करून त्यांना विशिष्ट कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. काही ठिकाणी तर कोचिंग क्लास आणि महाविद्यालय यांच्यातील संबंध इतके दृढ आहेत की विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची यादीच आधीपासून तयार असल्याचे बोलले जाते. शहरामध्ये संस्कार व नीतिमत्ता शिकवणारी एक प्रसिद्ध शाळा असून या शाळेला स्वयंसाहाय्यर्थ कनिष्ठ महाविद्यालय देण्यात आलेले आहे. संस्थाचालकाच्या वतीने कारभार करणार्‍या व संस्काराचे डोस सातत्याने विद्यार्थी व पालकांना देणार्‍या  ’सूर्याचे नाव धारण करणार्‍या’ स्वयंघोषित संस्थाचालकाने मालामाल होण्यासाठी विद्यार्थी केवळ हजेरीपटावर दाखविण्याचा गोरख धंदा सुरू केल्यामुळे विद्यादान व संस्काराचा उदोउदो करणार्‍या  या संस्थाचालकाचा खरा चेहरा या निमित्ताने नांदेडमध्ये समोर आला आहे. या महाविद्यालयांमध्ये क्रॉप सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स आणि कौशल्याधारित अभ्यासक्रमांची सुविधा असल्यामुळे विद्यार्थ्यांचा ओढा नैसर्गिकरीत्या असणे अपेक्षित आहे. मात्र प्रत्यक्षात विद्यार्थी महाविद्यालयीन शिक्षणासाठी नव्हे तर कोचिंग क्लासच्या सोयीसाठी प्रवेश घेत असल्याचे वास्तव समोर येत आहे. दिवसभर कोचिंग क्लासमध्ये शिकायचे आणि केवळ नावापुरत्या महाविद्यालयात प्रवेश ठेवायचा, अशी व्यवस्था अनेक विद्यार्थ्यांसाठी आकर्षक ठरत आहे. उपस्थितीची सक्ती नाही, बायोमेट्रिक व्यवस्था नाही, वर्गात जाण्याची गरज नाही आणि तरीही शैक्षणिक लाभ कायम; अशा नामधारी कॉलेज संस्कृतीला खतपाणी घालणारी ही यंत्रणा दिवसेंदिवस मजबूत होत आहे. यामुळे शिक्षणाच्या मूळ संकल्पनेलाच तडा जात आहे. महाविद्यालयीन शिक्षण हे केवळ परीक्षेपुरते नसून व्यक्तिमत्त्व विकास, सामाजिक भान, प्रयोगशाळेतील अनुभव, चर्चासत्रे आणि शैक्षणिक संस्कार यांचा समन्वय असतो. मात्र कोचिंग क्लास संस्कृतीमुळे विद्यार्थी महाविद्यालयांपासून पूर्णपणे दुरावत आहेत. नीट पेपरफुटी प्रकरणानंतर देशभर कोचिंग इंडस्ट्रीबाबत संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. लातूर आणि नांदेडमधील काही शिक्षक व प्राध्यापकांची नावे विविध चर्चांमध्ये पुढे आल्याने या उद्योगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षणाऐवजी गुण, रँक आणि प्रवेश यांच्याभोवती उभारलेल्या या कोचिंग साम्राज्यामुळे शिक्षणाचा आत्माच हरवला जात असल्याची भावना अनेक शिक्षणतज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. विशेष चिंतेची बाब म्हणजे महाविद्यालयात नियमितपणे उपस्थित नसलेल्या विद्यार्थ्यांनाही प्रात्यक्षिक परीक्षांमध्ये पैकीच्या पैकी गुण दिले जात असल्याच्या तक्रारी सातत्याने पुढे येत आहेत. प्रयोगशाळेत कधी पाऊलही न ठेवलेल्या विद्यार्थ्यांना उत्कृष्ट प्रात्यक्षिक गुण मिळतात, ही बाब संपूर्ण मूल्यमापन प्रक्रियेवरच प्रश्न उपस्थित करणारी आहे. शिक्षण विभागाची भूमिकाही तितकीच संशयास्पद ठरत आहे. नवीन स्वयंसाहाय्यर्थ महाविद्यालयांना मंजुरी देताना केवळ कागदपत्रांची पूर्तता पाहिली जाते. प्रत्यक्ष पडताळणी कितपत होते, हा प्रश्न आहे. अनेक ठिकाणी स्वतंत्र वर्गखोल्या नाहीत, प्रयोगशाळा नाहीत, कायमस्वरूपी प्राध्यापक नाहीत; तरीही शेकडो प्रवेश कसे होतात? या विद्यार्थ्यांचे अध्यापन नेमके कुठे आणि कसे चालते? याची चौकशी करण्याची जबाबदारी प्रशासनाची नाही का? शिक्षण विभागाने जर वेळेत कठोर पावले उचलली नाहीत तर भविष्यात पेपरफुटी, बनावट उपस्थिती, गुणफुगवटा आणि शैक्षणिक भ्रष्टाचार यांसारख्या अनिष्ट प्रथा आणखी बळावतील. शिक्षणाच्या नावाखाली सुरू असलेल्या या आर्थिक साखळीमध्ये कोणाचे हितसंबंध गुंतले आहेत, याचाही शोध घेणे आवश्यक आहे. आज गरज आहे ती केवळ प्रवेशसंख्येची नाही तर शिक्षणाच्या गुणवत्तेची. विद्यार्थी महाविद्यालयात प्रत्यक्ष शिकत आहेत का, प्रयोगशाळा कार्यरत आहेत का, शिक्षक उपलब्ध आहेत का आणि प्रवेश प्रक्रिया पारदर्शक आहे का, याची राज्यस्तरीय चौकशी झाली पाहिजे. अन्यथा उद्याच्या पिढीचे शिक्षण कोचिंग क्लासेसच्या व्यावसायिक गणितात अडकून पडेल आणि महाविद्यालये केवळ प्रमाणपत्रे वाटणारी केंद्रे बनतील. शिक्षणाचा हा बाजार थांबवायचा असेल तर शासन, शिक्षण विभाग आणि विद्यापीठांनी आता तरी जागे होणे गरजेचे आहे. अन्यथा गुणवत्तापूर्ण शिक्षण देणार्‍या संस्था ओस पडतील आणि नामधारी महाविद्यालयांच्या भरभराटीचा हा खेळ भविष्यात संपूर्ण शिक्षण व्यवस्थेलाच खिळखिळे करून टाकेल.

COMMENTS