शेवगाव: शहरातील सोनार पेठ, जैन गल्ली, मोची गल्ली व धर्मशाळा परिसरातील प्रलंबित अतिक्रमणे तातडीने हटवावीत, अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्

शेवगाव: शहरातील सोनार पेठ, जैन गल्ली, मोची गल्ली व धर्मशाळा परिसरातील प्रलंबित अतिक्रमणे तातडीने हटवावीत, अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा थेट इशारा नगर परिषदेला शुक्रवारी दिलेल्या निवेदनातून देण्यात आला आहे.
वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली मुख्याधिकाऱ्यांना हे निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, सुमारे दीड-दोन महिन्यांपूर्वी संबंधित अतिक्रमणधारकांना नियमानुसार नोटिसा देण्यात आल्या होत्या. मात्र, तरीही अद्याप संबंधित भागातील अतिक्रमणांवर नगर परिषदेकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही.
नगर परिषदेकडून गोरगरीब व छोट्या व्यावसायिकांवरील अतिक्रमणे हटविताना मोठी तत्परता दाखविण्यात आली; मात्र प्रभावशाली व धनदांडग्या व्यक्तींच्या अतिक्रमणांबाबत प्रशासनाकडून टाळाटाळ व दिरंगाई केली जात असल्याचा गंभीर आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. प्रशासनाने सर्वसामान्यांप्रमाणे धनदांडग्यांवरही समान निकष लावून निष्पक्ष कारवाई करावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे.
तसेच सोनार पेठ, जैन गल्ली, मोची गल्ली, शिवाजी चौक परिसर तसेच धर्मशाळा परिसरातील अतिक्रमणे कोणतीही पूर्वसूचना न देता तात्काळ निष्कासित करावीत, अशी स्पष्ट भूमिका निवेदनाद्वारे मांडण्यात आली आहे.
अतिक्रमणे न हटवल्यास वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि पीडित व्यावसायिक शेवगाव नगर परिषद कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करतील. या आंदोलनातून उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रसंगाला व परिस्थितीला प्रशासनच पूर्णपणे जबाबदार राहील, असा इशाराही देण्यात आला आहे. या निवेदनाच्या प्रती शेवगावचे तहसीलदार तसेच पोलीस निरीक्षकांनाही देण्यात आल्या आहेत.

COMMENTS