नांदेड : काही आठवड्यांपूर्वी मोठ्या थाटामाटात जाहीर करण्यात आलेला नांदेडमधील 4 हजार 250 कोटी रुपयांचा प्रस्तावित हेलिकॉप्टर उत्पादन प्रकल्प आता व

नांदेड : काही आठवड्यांपूर्वी मोठ्या थाटामाटात जाहीर करण्यात आलेला नांदेडमधील 4 हजार 250 कोटी रुपयांचा प्रस्तावित हेलिकॉप्टर उत्पादन प्रकल्प आता वादाच्या भोवर्यात सापडला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि खासदार अशोकराव चव्हाण यांनी मार्च महिन्यात या प्रकल्पाची घोषणा करत नांदेडच्या औद्योगिक भविष्याची मोठी स्वप्ने रंगवली होती. मात्र उद्योगमंत्री उदय सामंत यांनी ताज्या वक्तव्यात असा कोणताही प्रकल्प नांदेडमध्ये होणार नसल्याचे संकेत दिल्याने जिल्ह्यात संताप, संभ्रम आणि राजकीय खळबळ उडाली आहे. उद्योगमंत्राच्या खुलाश्यामुळे हेलिकॉप्टर प्रकल्पाच्या फुग्यातील हवा टाचणी मारल्यामुळे निघून गेली आहे.
ज्या प्रकल्पाच्या नावावर रोजगार, गुंतवणूक, उद्योगक्रांती आणि मराठवाड्याच्या विकासाची भाषा केली गेली, तोच प्रकल्प आता कागदावरही नाही का, असा थेट सवाल नागरिक विचारू लागले आहेत. घोषणांच्या फुग्याला वास्तवाचा टाचणी लागल्याची चर्चा सर्वत्र रंगली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनतेसमोर विकासाचे स्वप्न दाखवून आता हात झटकले जात आहेत का, असा रोखठोक प्रश्न विरोधकांनी उपस्थित केला आहे. या प्रकल्पासाठी नायगाव तालुक्यातील कृष्णूर औद्योगिक वसाहतीत जागा उपलब्ध करून देण्याची मागणी नायगाव विधानसभेचे भाजपाचे आमदार राजेश पवार यांनी केली होती. स्थानिक पातळीवर मोठी अपेक्षा निर्माण झाली होती. अनेक युवकांनी रोजगाराच्या आशेने या प्रकल्पाकडे पाहिले. मात्र आता उद्योग मंत्र्यांच्या वक्तव्यामुळे हा प्रकल्प नक्की कुठे गेला, कोणाच्या फाईलमध्ये अडकला, की सुरुवातीपासूनच फक्त राजकीय घोषणा होती, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सोशल मीडियावरही या मुद्द्याने जोर धरला असून सत्ताधारी गटांमध्येच श्रेयवादाची उघडी लढाई सुरू झाल्याचे चित्र आहे. एक गट प्रकल्प आम्ही आणला म्हणतो, तर दुसरा गट असा प्रकल्प अस्तित्वातच नव्हता, असे सांगत आहे. परिणामी नांदेडकरांच्या पदरी पुन्हा एकदा आश्वासनांची राख पडण्याची भीती व्यक्त होत आहे.
खा. अशोकराव चव्हाण यांनी खुलासा करावा
राज्याचे मुख्यमंत्रीपद भूषविणारे खा. अशोकराव चव्हाण यांच्यासारख्या जबाबदार नेत्यांनी हेलीप्लांट हा औद्योगिक प्रकल्प नांदेडमध्ये सुरू होणार असल्याची फसवी घोषणा केली होती हे उद्योगमंत्र्याच्या खुलाश्यामुळे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता हा प्रकल्प खरोखरच होणार आहे की नाही याबाबत अधिकृत खुलासा खासदार अशोकराव चव्हाणच करू शकतात असे नांदेड जिल्ह्याचे खासदार रवींद्र चव्हाण यांनी सांगितले आहे.
राज्यात एकत्र काम करत असताना नांदेड जिल्ह्यामध्ये खासदार अशोकराव चव्हाण यांनी हेलिकॉप्टर निर्मितीचा प्रकल्प आणण्याची घोषणा केली होती. परंतु अलीकडेच नांदेड जिल्ह्याच्या दौर्यावर आलेल्या उद्योगमंत्र्याच्या वक्तव्यावरून असे वाटते की सत्ताधारी नांदेडच्या जनतेच्या डोळ्यात धूळ फेकण्याचं काम करत आहेत. एकीकडे खा. अशोकराव चव्हाण म्हणतात की मी हेलिकॉप्टर कारखाना नांदेडसाठी आणलो आणि दुसरीकडे उद्योगमंत्री म्हणतात की हेलिकॉप्टर कारखाना नांदेडमध्ये मंजूर झाला हेच मला माहीत नाही, याच्या पेक्षा दुर्दैव हे नांदेड जिल्ह्याचं असू शकत नाही.
प्रकाश मारावार, शिवसेना (ठाकरे गट)

COMMENTS