मुंबई : मध्यपूर्वेत वाढत चाललेल्या तणावपूर्ण आणि युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने घेतलेल्या अलीकडील निर्णयांबाबत ज्येष्ठ नेत

मुंबई : मध्यपूर्वेत वाढत चाललेल्या तणावपूर्ण आणि युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने घेतलेल्या अलीकडील निर्णयांबाबत ज्येष्ठ नेते खा. शरद पवार यांनी चिंता व्यक्त केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन दिवसांपूर्वी केलेल्या घोषणांचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर दूरगामी परिणाम होऊ शकतो, असे त्यांनी म्हटले आहे. या निर्णयांमुळे सामान्य नागरिक, उद्योग क्षेत्र आणि गुंतवणूकदारांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाल्याचेही नमूद करत पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्रीय हितासाठी आणि राष्ट्रीय प्रश्नांवर व्यापक चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावण्याची मागणी शरद पवार यांनी मंगळवारी केली.
देशासमोर निर्माण झालेल्या परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून पंतप्रधानांनी स्वतःच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक बोलवावी, अशी मागणी शरद पवार यांनी केली. राष्ट्रीय हिताच्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर निर्णय घेताना सर्व राजकीय पक्षांना विश्वासात घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. देशहिताच्या विषयांवर सामूहिक चर्चा आणि व्यापक सल्लामसलत अधिक प्रभावी ठरू शकते, असेही त्यांनी सांगितले. सध्याच्या आंतरराष्ट्रीय घडामोडींचा भारतीय अर्थव्यवस्था आणि उद्योग क्षेत्रावर नेमका काय परिणाम होऊ शकतो, याचा सखोल अभ्यास करण्याची गरज असल्याचे पवार यांनी नमूद केले. त्यासाठी अर्थतज्ज्ञ, उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी आणि विविध तज्ज्ञांची तातडीने बैठक आयोजित करावी, अशी मागणी त्यांनी केली. आगामी धोरणांबाबत सर्व संबंधित घटकांशी विचारविनिमय करूनच पुढील निर्णय घ्यावेत, असेही त्यांनी सुचवले. देशातील जनतेमध्ये विश्वास, स्थैर्य आणि सुरक्षिततेची भावना निर्माण करणे हेच सध्याच्या परिस्थितीत केंद्र सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असले पाहिजे, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.

COMMENTS