श्रीगोंदा : मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवून स्वतःसह इतर नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण करणाऱ्या वाहनचालकांविरोधात श्रीगोंदा पोलिसांनी विशेष मोही

श्रीगोंदा : मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवून स्वतःसह इतर नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण करणाऱ्या वाहनचालकांविरोधात श्रीगोंदा पोलिसांनी विशेष मोहीम राबवत धडक कारवाई केली. गेल्या दोन दिवसांत करण्यात आलेल्या या कारवाईत पाच वाहनचालकांवर ‘ ड्रंक अँड ड्राईव्ह’ प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.श्रीगोंदा पोलीस स्टेशनच्या वतीने शहरातील प्रमुख चौक, महामार्ग तसेच संवेदनशील ठिकाणी अचानक नाकाबंदी करण्यात आली होती. या वेळी संशयित वाहनचालकांची ब्रेथ ॲनालायझर यंत्राद्वारे तपासणी करण्यात आली. तपासणीत रक्तातील अल्कोहोलचे प्रमाण कायदेशीर मर्यादेपेक्षा अधिक आढळलेल्या पाच वाहनचालकांविरोधात मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोटार वाहन कायद्यानुसार प्रथमच मद्यधुंद अवस्थेत वाहन चालविताना आढळल्यास १० हजार रुपयांपर्यंत दंड आणि सहा महिन्यांपर्यंत कारावासाची तरतूद आहे. त्याचप्रमाणे दुसऱ्यांदा हा गुन्हा केल्यास १५ हजार रुपयांपर्यंत दंड आणि दोन वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते.याबाबत श्रीगोंदा पोलिसांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, मद्यप्राशन करून वाहन चालविणे हा गंभीर गुन्हा असून त्यामुळे स्वतःचा तसेच इतर निष्पाप नागरिकांचा जीव धोक्यात येतो. त्यामुळे सर्वांनी वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. वाहतूक शिस्त राखण्यासाठी आणि अपघातांना आळा घालण्यासाठी अशा प्रकारची विशेष मोहीम यापुढेही अधिक तीव्रतेने सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

COMMENTS