देवलाली प्रवरा : रासायनिक खतांचा वाढता आणि अमर्याद वापर जमिनीच्या आरोग्यासाठी घातक ठरत असून, त्याचा परिणाम हवामान बदल, पाण्याची गुणवत्ता आणि पिका

देवलाली प्रवरा : रासायनिक खतांचा वाढता आणि अमर्याद वापर जमिनीच्या आरोग्यासाठी घातक ठरत असून, त्याचा परिणाम हवामान बदल, पाण्याची गुणवत्ता आणि पिकांच्या उत्पादनक्षमतेवर होत असल्याची चिंता महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्ची यांनी व्यक्त केली. नैसर्गिक शेतीसाठी आवश्यक निविष्ठांची निर्मिती शेतातच व्हावी, यासाठी विद्यापीठाने विकसित केलेले एकात्मिक शेती पद्धतीचे मॉडेल शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग आणि ‘आत्मा’ यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय सभागृहात पुणे विभागीय नैसर्गिक शेती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्षस्थानावरून डॉ. खर्ची बोलत होते. यावेळी आत्माचे संचालक सुनील बोरकर, कृषी संचालक विनयकुमार आवटे, विभागीय कृषी सहसंचालक दत्तात्रय गवसाने यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
डॉ. खर्ची पुढे म्हणाले की, शेण, गोमूत्र आणि पिकांचे अवशेष हे शाश्वत शेतीचे महत्त्वाचे घटक आहेत. नैसर्गिक शेतीचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांनी समजून घेऊन आत्मसात करणे आवश्यक आहे. कार्यशाळेत सहभागी शेतकऱ्यांनी तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घेऊन कोणताही संभ्रम न ठेवता नैसर्गिक शेतीचा अवलंब करावा, असे आवाहन त्यांनी केले. सुनील बोरकर यांनी नैसर्गिक शेतीची चळवळ अधिक व्यापक करण्याची गरज व्यक्त केली. तांत्रिक सत्रात गोपालभाई सुतारिया, डॉ. प्रशांत नाईकवाडी, डॉ. उल्हास सुर्वे आणि दत्तात्रय शेरकर यांनी मार्गदर्शन केले.

COMMENTS