अकोले : देशभरात पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीच्या वाढत्या किमतींमुळे महागाईचा भडका उडाला असून सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. यातच आता देशातील

अकोले : देशभरात पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीच्या वाढत्या किमतींमुळे महागाईचा भडका उडाला असून सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. यातच आता देशातील इंधन साठ्याबाबत एक अत्यंत चिंताजनक माहिती समोर आली असून, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.
पेट्रोल आणि डिझेलच्या दरात ३ रुपये, तर सीएनजीमध्ये २ रुपयांची वाढ झाली आहे. आगामी काळात ही वाढ थेट १४ ते १७ रुपयांपर्यंत जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याच गंभीर परिस्थितीवर बोलताना माकपचे राज्य सचिव डॉ. अजित नवले यांनी केंद्र सरकारला धारेवर धरले असून महागाई रोखण्यासाठी युद्धपातळीवर पावले टाकण्याची मागणी केली आहे.
डॉ. नवले यांनी देशातील तेल साठ्याबाबत धक्कादायक आकडेवारी समोर आणली आहे. सध्या देशात ५१ दशलक्ष बॅरल इतकाच तेल साठा शिल्लक आहे, जो देशाची दैनंदिन गरज पाहता केवळ १८ दिवसच पुरू शकतो. अशा आणीबाणीच्या स्थितीतही भारताला रशियाकडून कच्चे तेल खरेदी करण्यासाठी अमेरिकेच्या परवानगीची वाट पाहावी लागत आहे, ही स्वाभिमानी भारतासाठी अत्यंत क्लेशदायक बाब असल्याचा टोला त्यांनी लगावला.
सध्या सरकार पेट्रोलवर प्रतिलीटर ३६ रुपये आणि डिझेलवर २८.५० रुपये इतका प्रचंड कर आणि कमिशन वसूल करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासियांना काटकसर करण्याचे आवाहन करत आहेत, परंतु केवळ आवाहनाने महागाई कमी होणार नाही. सरकारने स्वतः कर कमी करून जनतेला तातडीने दिलासा दिला पाहिजे, अशी मागणी माकपने केली आहे.
अमेरिकेचा दबाव झुगारून रशियाकडून स्वस्त इंधन आयात करावे आणि देशांतर्गत पेट्रोलियम साठा वाढवावा, अशी आग्रही मागणी आता डाव्या पक्षांकडून केली जात आहे. इंधनाचा हा भडका सरकार वेळीच शांत करणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

COMMENTS