Homeताज्या बातम्या

ओमानमध्ये भारतीय जहाजावर हल्ला; तीन भारतीयांचा मृत्यू

तेल अवीव/तेहरान/वॉशिंग्टन : मध्यपूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर भारतीय खलाशी असलेल्या जहाजांवरील हल्ल्यांची मालिका सुरूच असून गुरुवारी

जागतिक ऊर्जासंकट आणि युद्ध !
अमेरिकेने मोडला युद्धविराम; इराणवर पुन्हा बॉम्बवर्षाव !
अमेरिका-इराण संघर्षात भारतीय जहाज बुडाले; एका खलाशाचा मृत्यू, १७ जणांची सुखरूप सुटका


तेल अवीव/तेहरान/वॉशिंग्टन : मध्यपूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर भारतीय खलाशी असलेल्या जहाजांवरील हल्ल्यांची मालिका सुरूच असून गुरुवारी ओमानच्या किनार्‍याजवळ आणखी एका तेलवाहू जहाजावर हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. हल्ल्यानंतर जहाजाला आग लागल्याचे वृत्त असून भारतीय दूतावासाने स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले असल्याचे सांगितले आहे.
ओमानमधील शिनास बंदर परिसरात भारतीय खलाशी कार्यरत असलेल्या ‘जलवीर’ या जहाजावर हल्ला झाला. हल्ल्यानंतर जहाजातून धुराचे लोट उठताना दिसले. जहाजावरील सर्व कर्मचार्‍यांच्या सुरक्षिततेबाबत अद्याप अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र भारतीय दूतावासाने आवश्यक मदत व समन्वय सुरू असल्याचे स्पष्ट केले आहे. होर्मुझ सामुद्रधुनीजवळ काही दिवसांपूर्वी घडलेल्या दुसर्‍या घटनेत भारतीय खलाशी असलेल्या ‘सेट्टेबेलो’ या तेलवाहू जहाजावर झालेल्या हल्ल्यात तीन भारतीयांचा मृत्यू झाल्याची अधिकृत पुष्टी झाली आहे. केंद्रीय मंत्री सरबानंद सोनोवाल यांनी ही माहिती देताना या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले. मृतांपैकी दोघांचे मृतदेह सापडले असून तिसर्‍या व्यक्तीच्याही मृत्यूची खात्री झाली आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार, जहाजावरील 24 भारतीयांपैकी 21 जणांची सुरक्षित सुटका करण्यात आली होती. उर्वरित तिघे बेपत्ता असल्याचे सुरुवातीला सांगण्यात आले होते. आता त्यांच्या मृत्यूची पुष्टी झाल्याने सागरी क्षेत्रात शोककळा पसरली आहे. मृत भारतीयांमध्ये आदित्य शर्मा, शिवानंद चौरसिया आणि पटनाला सुरेश यांचा समावेश आहे. सुरुवातीला पटनाला सुरेश बेपत्ता असल्याचे वृत्त होते; मात्र नंतर त्यांच्या मृत्यूचीही अधिकृत नोंद करण्यात आली. सरबानंद सोनोवाल यांनी सांगितले की, ही घटना केवळ संबंधित कुटुंबीयांसाठी नव्हे तर संपूर्ण भारतीय सागरी समुदायासाठी मोठा धक्का आहे. केंद्र सरकार मृतांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी ठामपणे उभे असून त्यांना सर्वतोपरी मदत केली जाईल. तसेच वाचवण्यात आलेल्या भारतीय खलाशांना लवकरात लवकर मायदेशी आणण्याचे आणि मृतांचे पार्थिव कुटुंबीयांच्या ताब्यात देण्याचे निर्देश संबंधित अधिकार्‍यांना देण्यात आले आहेत.
मध्यपूर्वेतील संघर्ष अधिक तीव्र
अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष गुरुवारीही सुरूच राहिला. दोन्ही देशांकडून हल्ले आणि प्रत्युत्तराच्या कारवाया सुरू असल्याने संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. अमेरिकेने इराणमधील विविध लक्ष्यांवर क्षेपणास्त्र आणि हवाई हल्ले केल्याचा दावा केला आहे. जॉर्डनने आपल्या हवाई क्षेत्राकडे येणारी इराणची पाच क्षेपणास्त्रे हवेतच नष्ट केल्याचा दावा केला आहे.
तीन दिवसांत दोन जहाजांवर हल्ले
गेल्या तीन दिवसांत भारतीय खलाशी असलेल्या दोन जहाजांवर हल्ले झाल्याने भारतीय सागरी सुरक्षेबाबत चिंता वाढली आहे. पहिल्या घटनेत जहाजावरील सर्व खलाशांची सुखरूप सुटका करण्यात यश आले होते. मात्र दुसर्‍या घटनेत तीन भारतीयांना जीव गमवावा लागला. आता ओमान किनार्‍याजवळ घडलेल्या नव्या हल्ल्यामुळे भारतीय नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

COMMENTS