Homeताज्या बातम्यादेश

डॉलरच्या तुलनेत रुपयाची 95.75 विक्रमी घसरण

नवी दिल्ली : अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची घसरण सुरूच असून रुपया इतिहासातील नीचांकी पातळीवर पोहोचला. एका डॉलरची किंमत तब्बल 95 रुपये 75

रुपयाची घसरण ऐतिहासिक नीचांकी पातळीवर95.94 वर पोहोचला रूपया ; महागाईचा भडका उडण्याची शक्यता
पेट्रोल-डिझेल तीन रूपयांनी महागलेनव्या दरांमुळे सर्वसामान्यांवर आर्थिक ताण
पंतप्रधानांनी ताफ्यातील वाहनांची संख्या केली कमीकेवळ दोन गाड्या घेऊन पोहोचले कॅबिनेट बैठकीला


नवी दिल्ली : अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची घसरण सुरूच असून रुपया इतिहासातील नीचांकी पातळीवर पोहोचला. एका डॉलरची किंमत तब्बल 95 रुपये 75 पैसे इतकी नोंदवली गेली. यापूर्वीही रुपयाने 95 रुपये 50 पैशांचा स्तर गाठला होता. गेल्या काही दिवसांपासून रुपयावर सातत्याने दबाव वाढत असल्याचे चित्र आहे.
यंदाच्या सुरुवातीपासूनच रुपयामध्ये कमजोरी दिसून येत आहे. डिसेंबर 2025 मध्ये प्रथमच डॉलरचा दर 90 रुपयांच्या पुढे गेला होता. आता रुपयाची सातत्याने होत असलेली घसरण देशातील महागाई वाढवू शकते, अशी चिंता व्यक्त होत आहे. तज्ज्ञांच्या मते, पश्‍चिम आशियातील तणाव आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती हे रुपयाच्या घसरणीमागील प्रमुख कारण ठरत आहेत. अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्षामुळे जागतिक बाजारात अस्थिरता निर्माण झाली असून कच्च्या तेलाचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे भारतासारख्या तेल आयात करणार्‍या देशांवर आर्थिक दबाव वाढत आहे.
भारत आपल्या गरजेपैकी बहुतांश कच्चे तेल परदेशातून खरेदी करतो. तेल महाग झाल्याने डॉलरची मागणी वाढते आणि त्याचा थेट परिणाम रुपयाच्या मूल्यात घट होण्यात दिसून येतो. वाढत्या आयात खर्चामुळे देशाच्या व्यापार तुटीतही वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जागतिक अनिश्‍चिततेच्या वातावरणात गुंतवणूकदार सुरक्षित पर्याय म्हणून अमेरिकन डॉलरकडे वळत आहेत. परिणामी भारतीय शेअर बाजारातून परदेशी गुंतवणूक बाहेर पडत असून डॉलरची मागणी आणखी वाढत आहे. यामुळे रुपयावर अधिक दबाव निर्माण झाला आहे. रुपयाच्या घसरणीचा परिणाम सामान्य नागरिकांवरही होण्याची शक्यता आहे. पेट्रोल-डिझेलचे दर वाढण्याबरोबरच गॅस, प्लास्टिक आणि इतर पेट्रोलियमजन्य वस्तू महाग होऊ शकतात. मोबाईल, संगणक, इलेक्ट्रॉनिक साहित्य तसेच परदेशातून आयात होणार्‍या वस्तूंच्या किमती वाढण्याची शक्यता आहे.

COMMENTS