श्रीगोंदा : तालुक्यातील उखलगाव येथील वाळके वस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षकांची तीव्र कमतरता निर्माण झाली आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या श

श्रीगोंदा : तालुक्यातील उखलगाव येथील वाळके वस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षकांची तीव्र कमतरता निर्माण झाली आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर गंभीर परिणाम होत असल्याचा आरोप करत ग्रामस्थ, पालक आणि शाळा व्यवस्थापन समितीने शिक्षण विभागाकडे तातडीने शिक्षक नियुक्त करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बाबासाहेब दरवडे यांच्या नेतृत्वाखाली १६ जून २०२६ रोजी जिल्हा परिषद शिक्षणाधिकाऱ्यांना लेखी निवेदन देण्यात आले.
निवेदनात नमूद केल्यानुसार, वाळके वस्ती उखलगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग सुरू असून विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय आहे. मात्र, संपूर्ण शाळेचा कारभार सध्या केवळ एकाच शिक्षकावर अवलंबून असल्याने शैक्षणिक व प्रशासकीय कामकाजावर मोठा ताण निर्माण झाला आहे. एकाच वेळी चारही वर्गांना अध्यापन करणे आणि विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष देणे एका शिक्षकाला अशक्य होत आहे. त्यामुळे डिजिटल बोर्ड, सीसीटीव्ही कॅमेरे, संगणक अशा आधुनिक सुविधा असूनही शिक्षकांअभावी त्यांचा प्रभावी वापर होत नसल्याची खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
शिक्षकांच्या या कमतरतेमुळे त्रस्त होऊन काही पालकांनी आपल्या मुलांचे प्रवेश इतर शाळांमध्ये घेण्यास सुरुवात केली आहे. परिणामी, भविष्यात ही शाळा बंद पडण्याच्या मार्गावर जाऊ शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे. शिक्षण विभागाने तातडीने रिक्त पदांवर शिक्षक उपलब्ध करून न दिल्यास व्यापक लोकआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. या निवेदनाच्या प्रती गटशिक्षणाधिकारी (श्रीगोंदा), बेलवंडी पोलीस स्टेशन तसेच ग्रामपंचायत उखलगाव यांनाही पाठवण्यात आल्या आहेत.

COMMENTS