बीड तालुक्यातील पाली सर्कल अंतर्गत आहेरवडगाव व परिसरात मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या कथित अनधिकृत व बेकायदेशीर उत्खननावर तातडीने कारवाई करून ते

बीड तालुक्यातील पाली सर्कल अंतर्गत आहेरवडगाव व परिसरात मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या कथित अनधिकृत व बेकायदेशीर उत्खननावर तातडीने कारवाई करून ते बंद करावे, तसेच संबंधित दोषींवर कठोर दंडात्मक व फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख सौ. मिराताई नवले यांनी जिल्हाधिकार्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
स्थानिक नागरिकांकडून अवैध उत्खननाबाबत तक्रारी प्राप्त झाल्यानंतर मिराताई नवले यांनी स्वतः घटनास्थळी जाऊन पाहणी केली. यावेळी महसूल विभागाची किंवा ग्रामपंचायतीची अधिकृत परवानगी नसतानाही उत्खनन सुरू असल्याचे निदर्शनास आल्याचा दावा त्यांनी निवेदनात केला आहे. या बेकायदेशीर उत्खननामुळे परिसरातील छोटी-मोठी झाडे उपटली जात असून पर्यावरणाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्याचबरोबर अवजड यंत्रसामग्री व वाहनांची मोठ्या प्रमाणावर वाहतूक होत असल्याने परिसरातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचे सांगण्यात आले.
जेसीबी, पोकलेनसह वाहने जप्त करण्याची मागणी
आहेरवडगाव व पाली सर्कल हद्दीतील सर्व अनधिकृत उत्खनन तातडीने बंद करावे. उत्खननासाठी वापरण्यात येणारे जेसीबी, पोकलेन तसेच इतर वाहने व यंत्रसामग्री जप्त करावी, अशी मागणी नवले यांनी केली आहे. शासनाचा महसूल बुडविणार्या तसेच पर्यावरणाची हानी करणार्या संबंधित व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करून फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. पाच दिवसांच्या आत संबंधितांवर गुन्हे दाखल करून कारवाई करावी, अशी स्पष्ट मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
अवैध उत्खननाबाबत प्रशासनाने तातडीने दखल घेऊन कठोर कारवाई केली नाही, तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महिला आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा सौ. मिराताई नवले यांनी दिला आहे. दरम्यान, या तक्रारीची महसूल प्रशासनाकडून चौकशी होऊन प्रत्यक्षात उत्खननासाठी आवश्यक परवानग्या आहेत का, शासनाचा महसूल बुडाला आहे का आणि पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन झाले आहे का, याबाबत प्रशासन कोणती कारवाई करते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

COMMENTS