सिव्हील निलंबन कारवाई निषेधार्थ काम बंद आंदोलन

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सिव्हील निलंबन कारवाई निषेधार्थ काम बंद आंदोलन

अहमदनगर/प्रतिनिधी : जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात लागलेल्या आगीत 11 जणांचा बळी गेला असून, या प्रकरणी जिल्हा शल्यचिकित्सकांसह पाचजणांना निलंबि

भाजपने नाविन्यपूर्ण योजनांतून केला देशाचा विकास ः आमदार मोनिका राजळे
नगरमध्ये अल्पवयीन मुलगी व महिला बेपत्ता
भातोडी लढाईचा प्रेरणादायी इतिहास घराघरांतून पोहोचावा ; शरीफजीराजे स्मृतिदिनी विविध पुरस्कारांचे वितरण

अहमदनगर/प्रतिनिधी : जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात लागलेल्या आगीत 11 जणांचा बळी गेला असून, या प्रकरणी जिल्हा शल्यचिकित्सकांसह पाचजणांना निलंबित करण्यात आले आहे. यातील दोन नर्सेसची सेवा समाप्त करण्यात आली आहे. त्यामुळे आता जिल्हा रुग्णालयात काम करणार्‍या अन्य नर्सेसमध्ये संताप उमटला असून आम्हाला सर्वांनाच निलंबित करा. आमची काय चूक ? अग्निशामक यंत्रणा बसवणे हे काय आमचे काम आहे का? असा सवाल त्यांनी केला आहे.

जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात लागलेल्या आगीच्या प्रकरणी जिल्हा शल्यचिकित्सक आणि स्टाफ नर्सेसना निलंबित करण्यात आले आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी कारवाईचा बडगा उगारत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा, डॉ.सुरेश ढाकणे (वैद्यकीय अधिकारी) डॉ. विशाखा शिंदे (वैद्यकीय अधिकारी), सपना पठारे (स्टाफ नर्स) यांना निलंबित करण्यात आले असून आस्मा शेख (स्टाफ नर्स) व चन्ना आनंत (स्टाफ नर्स) यांची सेवा समाप्त करण्यात आली आहे. त्यामुळे मंगळवारी सकाळी आरोग्य कर्मचार्‍यांनी एकत्र येत शासनाच्या या निर्णयाविरोधात जिल्हा रुग्णालय येथे घोषणाबाजी केली.

यावेळी आरोग्य कर्मचारी यांनी सांगितले की, अतिदक्षता विभाग किंवा इतर कोणत्याही विभागाची सुरक्षा, तांत्रिक यंत्रणा याची जबाबदारी ही वरिष्ठांची आणि त्या स्तरावरील विभागांची असते. मात्र, अचानक आग लागल्यानंतर त्यास जबाबदार धरून परिचरिकांना निलंबित करणे, सेवा समाप्ती करणे हा त्यांच्यावर केलेला अन्याय आहे. त्यामुळे निलंबन, सेवा समाप्ती कारवाई तातडीने मागे घेण्यात यावी. अन्यथा, राज्यभरातील परिचारिका संवर्गातील कर्मचारी आंदोलन करतील. यापुढे अतिदक्षता विभागामध्ये काम करण्यास नकार दिला जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी जिल्हा रुग्णालयातील सर्व नर्सेस काम सोडून बाहेर आल्या. आम्हाला आता निलंबित केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. आम्हाला निलंबित करा किंवा त्यांचे तरी निलंबन मागे घ्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. आमची मागणी सरकारकडे पोहोचवा असे त्यांनी सांगितले. कोरोनाच्या काळामध्ये आम्ही आमचे जीव धोक्यात घालून काम केले. जिल्हा रुग्णालयात लागलेल्या आग अग्निशमन यंत्रणा नसल्याने लागली आहे. अग्निशमन यंत्रणा बसवणे काय आमचं काम नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. या निषेध सभेनंतर सामाजिक जबाबदारी म्हणून आम्ही कार्यरत असणार आहोत. मात्र, अन्यायकारक पद्धतीने झालेल्या निलंबनाची कारवाई तातडीने मागे घ्यावी अशी मागणी असल्याचे यावेळी सांगण्यात आले. करोनाच्या काळामध्ये शासकीय परिचारिकांनी अहोरात्र काम केले असून अनेक रुग्णांचा जीव वाचवला आहे. नातेवाईकांना त्यांच्यासोबत थांबण्यास मज्जाव असताना आपल्या जीवावर उदार होऊन परिचारिकांनी रुग्णसेवेचे काम केले आहे. या कामाचे कौतुकही करण्यात येत असताना आता दुसर्‍यांच्या चुकीची शिक्षा परिचरिकांना देणे चुकीचे असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

COMMENTS