केज तालुक्यातील तसेच धारूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात पत्नीच्या कथित अनैतिक संबंधांच्या वादातून पतीला मारहाण करून जातीयवाचक शिवीगाळ केल्

केज तालुक्यातील तसेच धारूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात पत्नीच्या कथित अनैतिक संबंधांच्या वादातून पतीला मारहाण करून जातीयवाचक शिवीगाळ केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी धारूर पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादीचा विवाह सुमारे नऊ वर्षांपूर्वी झाला असून त्यांना दोन मुले आहेत. फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या पत्नीचे गावातील एका व्यक्तीसोबत प्रेमसंबंध असल्याची माहिती 2025 मध्ये समोर आली होती. यानंतर फिर्यादीने पत्नीला समजावण्याचा प्रयत्न केला तसेच सासरच्या मंडळींनाही याबाबत माहिती देत तिला माहेरी पाठवले होते. त्यानंतर मध्यस्थी झाल्यानंतर पत्नीने व्यवस्थित वागण्याचे आश्वासन दिल्याने 9 मे 2026 रोजी फिर्यादीने तिला पुन्हा घरी आणले. यावेळी सासरच्या मंडळींनी पतीकडून कोणताही त्रास दिला जाणार नाही, असे 100 रुपयांच्या बाँडवर लिहून घेतल्याचे फिर्यादीने तक्रारीत नमूद केले आहे. दरम्यान, 15 मे रोजी फिर्यादीच्या सासूच्या मोबाईलवर संबंधित व्यक्तीचा फोन आल्याचे दिसून आले. त्यानंतर फिर्यादी पत्नीला घेऊन संबंधित व्यक्तीविरोधात तक्रार देण्यासाठी धारूर पोलीस ठाण्यात गेले होते. मात्र परस्पर समेट झाल्याने तक्रार देण्यात आली नाही. तक्रारीनुसार, त्याच रात्री सुमारे 8.15 वाजता घरी परतल्यानंतर फिर्यादीची पत्नी मोटारसायकलवरून उतरून मला तुझ्याकडे राहायचे नाही असे म्हणत संबंधित व्यक्तीच्या घराकडे गेली. पत्नीला परत आणण्यासाठी गेलेल्या फिर्यादीला तेथे आरोपींनी अडवून जातीयवाचक शिवीगाळ करत लोखंडी रॉडने मारहाण केल्याचा आरोप आहे. या घटनेत फिर्यादी जखमी झाले असून त्यांच्या डोक्याला दुखापत होऊन रक्तस्राव झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. भांडण सोडवण्यासाठी आलेल्या फिर्यादीच्या आई-वडिलांनाही मारहाण झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. स्थानिक नागरिकांनी मध्यस्थी करत वाद शांत केला. या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून अजय फुलचंद डोईफोडे, विजय फुलचंद डोईफोडे, ज्ञानोबा बाबुराव डोईफोडे, मंगल तुकाराम डोईफोडे आणि अश्विनी फुलचंद डोईफोडे यांच्याविरुद्ध गु.र.नं. 192/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता (इछड) मधील विविध कलमे तसेच अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस अधीक्षक वेंकटराम करत आहेत.

COMMENTS