Homeताज्या बातम्या

दमिरर..!

धिंड काढून काय साध्य झाले? आरोपींच्या हास्यातून उघड झालेली कायद्याची भीषण शोकांतिका!धिंड काढुनी काय झाले, जर हास्य ओठी राहिले;खाकीचा धाक तोच खरा,

दरोडा व बलात्काराच्या गुन्हयात आरोपीस 10 वर्षे सक्तमजुरी
पवनचक्कीवर दरोडा टाकणार्‍या अट्टल टोळीला ठोकल्या बेड्या; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई
लाच घेताना महावितरणची महिला सहाय्यक अभियंता रंगेहात जेरबंद; एसीबीची आष्टीत धडक कारवाई


धिंड काढून काय साध्य झाले? आरोपींच्या हास्यातून उघड झालेली कायद्याची भीषण शोकांतिका!
धिंड काढुनी काय झाले, जर हास्य ओठी राहिले;खाकीचा धाक तोच खरा, जो अपराध्याच्या माजाला झुकविले!
परळी येथील तोहीद खान हत्या प्रकरणातील आरोपींची पोलिसांनी मोठ्या दिमाखात धिंड काढली. ज्या-ज्या ठिकाणी आरोपी गेले होते, त्या-त्या ठिकाणी त्यांना घेऊन जात पंचनामा करण्यात आला. पाहणार्‍यांना हा प्रकार पोलिसी कारवाईचा कठोर नमुना वाटला असेल. परंतु या संपूर्ण घटनेचा दुसरा आणि अधिक गंभीर पैलू समाजाने पाहिला का?
धिंड काढताना आरोपींच्या चेहर्‍यावर अपराधाची जाणीव नव्हती, पश्चात्ताप नव्हता, लाज नव्हती. उलट ते रस्त्यावरून चालताना हसत होते, इकडे-तिकडे पाहत होते. जणू काही त्यांनी कुठलाही गंभीर गुन्हा केलेला नाही. हा प्रकार केवळ धक्कादायक नाही तर राज्याच्या कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे. प्रश्न असा आहे की, जर आरोपींना सार्वजनिकरित्या फिरवूनही त्यांच्या चेहर्‍यावर भीतीचा लवलेश दिसत नसेल, तर ही धिंड नेमकी कोणासाठी होती? जनतेच्या समाधानासाठी की कायद्याच्या धाकाचे प्रदर्शन करण्यासाठी? कारण खरा धाक तोच असतो जो गुन्हेगाराच्या मनात अपराधाची भीती निर्माण करतो. जर आरोपी हसत असतील, तर ते पोलिसांवर नाही तर संपूर्ण व्यवस्थेवर हसत आहेत, असे म्हणावे लागेल. बीड जिल्ह्याचा उल्लेख अनेकदा बिहार म्हणून केला जातो. ही उपमा अनेकांना खटकत असली तरी सध्या जिल्ह्यात घडणार्‍या घटना पाहता ती कुठेतरी वास्तवाच्या जवळ जात आहे का, असा प्रश्न निर्माण होतो. खून, मारामार्‍या, टोळीयुद्ध, अवैध धंदे आणि वाढता गुन्हेगारी प्रवाह ही चिंतेची बाब बनली आहे. विशेषतः तरुण पिढी मोठ्या प्रमाणावर नशेच्या विळख्यात अडकताना दिसत आहे. गावागावांत अमली पदार्थांची विक्री सुरू आहे. या व्यवसायामागे केवळ विक्रेते नाहीत तर त्यांना राजकीय संरक्षण देणारे हातही असल्याची चर्चा उघडपणे होताना दिसते. राजकीय पाठबळाशिवाय एवढ्या मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर धंदे फोफावणे शक्य नाही, हे वास्तव आहे. आज अनेक तथाकथित नेते समाज घडवण्याऐवजी समाज फोडण्याचे काम करत आहेत. जात, धर्म, पंथ यांच्या नावावर द्वेषाची भिंत उभी केली जात आहे. तरुणांच्या हातात रोजगाराऐवजी वैर दिले जात आहे. विचाराऐवजी विष पेरले जात आहे. परिणामी समाजात तणाव वाढतो, हिंसा वाढते आणि शेवटी एखाद्या निष्पाप तरुणाचा बळी जातो. परळीतील घटनेत आरोपींची मानसिकता नेमकी काय होती, याचा अंदाज व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमधून जनतेला आधीच आला होता. त्या क्लिपमधून दिसलेला उन्माद आणि आज धिंड काढताना दिसलेला बेफिकीरपणा यामध्ये फारसा फरक नव्हता. उलट आरोपींच्या चेहर्‍यावरील हास्य हेच सांगत होते की, त्यांना कायद्याची भीती नाही. ही स्थिती केवळ पोलिसांची अपयशकथा नाही तर संपूर्ण सामाजिक आणि राजकीय व्यवस्थेच्या अधःपतनाचे प्रतीक आहे. गुन्हेगारांचा आत्मविश्वास वाढत असताना सामान्य नागरिकांचा कायद्यावरील विश्वास ढासळत आहे. जर गुन्हेगारांना शिक्षा होण्याची खात्री नसेल, जर त्यांना राजकीय संरक्षणाची हमी असेल आणि जर त्यांना सार्वजनिक धिंड काढूनही लाज वाटत नसेल, तर समाज कोणत्या दिशेने चालला आहे याचा गंभीर विचार करण्याची वेळ आली आहे. आज गरज धिंडीची नाही, तर कठोर आणि जलद न्यायाची आहे. गरज प्रसिद्धीची नाही, तर गुन्हेगारांच्या मनात कायद्याचा खरा धाक निर्माण करण्याची आहे. कारण आरोपींच्या चेहर्‍यावरचे हास्य हे केवळ एका घटनेचे चित्र नाही; ते व्यवस्थेच्या कमकुवत होत चाललेल्या पकडीचे भयावह प्रतिबिंब आहे. जोपर्यंत गुन्हेगारांच्या चेहर्‍यावरचे हे हास्य नाहीसे होत नाही, तोपर्यंत जनतेच्या मनातील असुरक्षिततेची भावना संपणार नाही. आणि जोपर्यंत कायद्याचा धाक गुन्हेगारांच्या माजाला झुकवत नाही, तोपर्यंत अशा धिंडी केवळ दिखावा ठरतील हे मात्र नक्कीच..!
काझी समीरोद्दीन
मो.9049904996

COMMENTS