परळी वै. : मराठवाड्यातील महादेव कोळी व मल्हार कोळी समाजाच्या जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रश्नावरून सुरू असलेले अन्नत्याग आंदोलन अधिक तीव्र झाले

परळी वै. : मराठवाड्यातील महादेव कोळी व मल्हार कोळी समाजाच्या जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रश्नावरून सुरू असलेले अन्नत्याग आंदोलन अधिक तीव्र झाले आहे. छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर गेल्या तीन दिवसांपासून 8 समाजबांधव जिवघेण्या उन्हात बेमुदत उपोषणावर ठाम बसले आहेत.
या आंदोलनात चंद्रहंस नलमले (निलंगा), अच्युतराव सोगे (सोनपेठ), शंकरराव गंगाधरे (परळी वैजनाथ), रेणुकाताई घोरपडे (पूर्णा), रोहिदास एम्बलवाड (पालम), गजानन चंदेवाड (अहमदपूर), सुभाष कांबळे (कळंब) आणि संदीप गवळे (सिल्लोड) हे सहभागी झाले असून, रविवार (दि. 3 मे) पासून त्यांनी अन्नत्याग सुरू केला आहे. या आंदोलनाला मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांतून मोठा प्रतिसाद मिळत आहे. दररोज वेगवेगळ्या जिल्ह्यांतील समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहून पाठिंबा दर्शवत आहेत. सोमवारी संभाजीनगर जिल्ह्यातील तर मंगळवारी परभणी जिल्ह्यातील बांधवांनी आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. दरम्यान, जात पडताळणी समितीचे संशोधन अधिकारी व आंदोलक यांच्यात सविस्तर चर्चा झाली. महादेव कोळी व मल्हार कोळी समाजाच्या पुराव्यांबाबतही विचारविनिमय झाला; मात्र कोणताही ठोस तोडगा निघाला नाही. अधिकार्यांनी पुढील मार्गदर्शनासाठी पुणे येथील आयुक्त व आदिवासी विभागाच्या सचिवांकडे पत्रव्यवहार करण्याचे आश्वासन दिले आहे. अधिकार्यांच्या आश्वासनानंतरही आंदोलकांनी स्पष्ट केले आहे की, जोपर्यंत त्यांच्या मागण्यांवर ठोस निर्णय होत नाही, तोपर्यंत अन्नत्याग आंदोलन सुरूच राहील. पुढील काही दिवसांत लातूर, नांदेड, बीड, धाराशिव, जालना आणि हिंगोली जिल्ह्यांतील समाजबांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. महादेव कोळी व मल्हार कोळी समाजाला जात प्रमाणपत्र व जात वैधता सहज व सुलभ पद्धतीने मिळावी, हीच या आंदोलनाची प्रमुख मागणी आहे. सध्या या प्रक्रियेत येणार्या अडचणींमुळे समाजातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.

COMMENTS