Homeताज्या बातम्या

१५ ऑगस्टपर्यंत अहिल्यादेवी होळकर स्मारक पूर्ण होण्याची आशा मावळली १०० दिवसांच्या लक्ष्यालाही हुलकावणी; कामाच्या संथ गतीमुळे पुन्हा मुदत वाढण्याची चिन्हे

नांदेड: राज्य शासनाच्या निधीतून उभारण्यात येत असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकाचे काम येत्या १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनापर्यंत पूर्ण होण

एसटीचे सवलत स्मार्ट कार्ड काढण्यासाठी नागरिकांची ससेहोलपट; अकोलेत शिबिरे आयोजित करण्याची ग्राहक पंचायतीची मागणी
अकोलेत विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप
भेसळखोरांवर एफडीएचा दणका! २ महिन्यांत नांदेडच्या दूध संकलनात २२ हजार लिटरची घट

नांदेड: राज्य शासनाच्या निधीतून उभारण्यात येत असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकाचे काम येत्या १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनापर्यंत पूर्ण होण्याची शक्यता जवळपास मावळली आहे. महापालिकेच्या १०० दिवसांच्या विकास कार्यक्रमात या स्मारकाचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. मात्र प्रत्यक्ष कामाच्या संथ गतीमुळे हे लक्ष्यही अपूर्ण राहण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत. नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर यांच्या पाठपुराव्यामुळे राज्य शासनाने या स्मारकासाठी १० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. माता गुजरीजी विसावा उद्यानाशेजारी हे भव्य स्मारक उभारले जात असून, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीदिनी लोकार्पणाचा प्रारंभिक मानस होता. मात्र विविध तांत्रिक आणि प्रशासकीय कारणांमुळे काम वेळेत पूर्ण होऊ शकले नाही. महापौर कविता मुळे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर राबवण्यात आलेल्या १०० दिवसांच्या विकास कार्यक्रमात या स्मारकाचा समावेश करण्यात आला होता. त्यानंतरही कामाची मुदत वाढवून १५ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले. परंतु सध्याची कामाची प्रगती पाहता त्या मुदतीतही प्रकल्प पूर्ण होणे अशक्य असल्याचे चित्र आहे. दरम्यान, कंत्राटदाराने काम सुरू करण्यासाठी जागा उपलब्ध करून देणे, डोमचे अंतिम डिझाइन आणि इतर तांत्रिक बाबी वेळेत मिळाव्यात यासाठी अनेक वेळा पत्रव्यवहार केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रक्रिया झालेल्या विलंबामुळे कामाच्या गतीवर परिणाम झाल्याचे बोलले जात आहे. यामुळे मनपा बांधकाम विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता दिलीप टाकळीकर यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. सध्याच्या स्थितीनुसार स्मारकाचे उर्वरित काम पूर्ण होण्यासाठी आणखी काही महिने लागू शकतात, अशी शक्यता व्यक्त केली जात असून ऑक्टोबर-नोव्हेंबरपर्यंतच हा प्रकल्प पूर्णत्वास जाईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर पूर्ण होणाऱ्या महत्वाकांक्षी प्रकल्पांच्या यादीतून अहिल्यादेवी होळकर स्मारकाचे नाव वगळले जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आता या विलंबाची जबाबदारी निश्चित करून प्रशासन आवश्यक कारवाई करणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

COMMENTS