Homeताज्या बातम्या

समतेचा रथ आता रोखणार नाही; राजेश घोडेंच्या मातंग क्रांती मोर्चाने बीड दणाणलेउपवर्गीकरण द्या, अन्यथा 2029 ला टांगा पलटी – मुख्यमंत्री फडणवीसांना सत्काराचे निमंत्रण; विरोधकांना रणांगणात येण्याचे आव्हान

बीड : दलित चळवळीचा नवा बुलंद आवाज, मातंग समाजाच्या अस्मितेचा प्रखर लढवय्या आणि आझाद क्रांती सेनेचा संस्थापक अध्यक्ष राजेश घोडे यांनी मंगळवारी बीड

भूमिहीन शेतकरी पत्नीच्या खांद्यावरून उतरले जोखड!गायकवाड कुटुंबियांना दिलासा ; मुख्यमंत्री फडणवीस यांची संवेदनशीलता
मिसिंग लिंक प्रकल्पाबाबतच्या अफवांवर भाजपने व्हिडिओ शेअर करत दिले थेट उत्तर, अतिवृष्टीमुळे आलेला मलबा प्रशासनाने अवघ्या काही वेळातच केला पूर्णपणे साफ!
आ.रोहित पवार यांची मुख्यमंत्र्यांसोबत भेट रस्ते, पूल आणि न्यायालयासाठी निधीची मागणी


बीड : दलित चळवळीचा नवा बुलंद आवाज, मातंग समाजाच्या अस्मितेचा प्रखर लढवय्या आणि आझाद क्रांती सेनेचा संस्थापक अध्यक्ष राजेश घोडे यांनी मंगळवारी बीडच्या रस्त्यावर हजारोंचा जनसागर उतरवून संपूर्ण महाराष्ट्र हादरून सोडला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवलेल्या समतेचा रथ आता कुठल्याही परिस्थितीत थांबणार नाही. वंचितातील वंचित मातंग बांधवाला न्याय देण्यासाठी आरक्षणात उपवर्गीकरण झालंच पाहिजे, असा रणघोष करत राजेश घोडे यांनी दि. 16 जून 2026 रोजी बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणारा विराट ’मातंग क्रांती मोर्चा’  काढला आणि राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली.
राज्यस्तरीय नेते, दलितांचा आधारवड
राजेश घोडे हे केवळ एक नाव नाही. गेल्या दोन दशकांपासून दलित-मातंग समाजाच्या प्रश्नांवर रस्त्यापासून सभागृहापर्यंत लढणारे ते राज्यस्तरीय नेते आहेत. गावखेड्यातील पिचलेल्या, अन्यायग्रस्त मातंग बांधवाचा आवाज बनून त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला आहे. शिक्षण, नोकरी, सन्मान या तिन्ही आघाड्यांवर मातंग समाजाची होणारी घुसमट त्यांनी शासन-प्रशासनाच्या कानावर आदळली आहे. त्यामुळेच आज त्यांच्या एका हाकेवर लाखोंचा जनसागर रस्त्यावर उतरतो.
बीडमध्ये हजारोंचा महापूर, व्यवस्थेला इशारा
बीडच्या इतिहासात पहिल्यांदाच इतका शिस्तबद्ध आणि विराट मोर्चा निघाला. जिल्ह्याच्या कानाकोपर्‍यातून आलेल्या मातंग बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला जणू वेढाच घातला. राज्यभरातील प्रमुख दलित संघटनांचे पदाधिकारी, विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले होते.
हक्क कागदावरच …
मोर्चाला संबोधित करताना राजेश घोडे कडाडले, स्वातंत्र्याला 78 वर्षे झाली, तरी वंचित समूहातील वंचित घटक आजही सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या खितपत पडला आहे. संविधानाने दिलेला हक्क कागदावरच राहिला. त्याला मुख्य प्रवाहात आणल्याशिवाय बाबासाहेबांच्या स्वप्नांची पूर्तता होणार नाही. म्हणून उपवर्गीकरण झालेच पाहिजे, यावर आमची ठाम भूमिका आहे.
मुख्यमंत्र्यांना ’शब्द’, विरोधकांना ’इशारा’  
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपवर्गीकरण करून देण्याचा शब्द दिल्याबद्दल राजेश घोडे यांनी त्यांचे जाहीर आभार मानले. जर मुख्यमंत्र्यांनी आमच्या वंचितातील वंचित बांधवाला न्याय दिला, तर आम्ही 10 हजार समाजबांधवांसह मुंबईत त्यांचा जाहीर नागरी सत्कार करू. हा मातंग समाज दिलेल्या शब्दाला जागतो, अशी ग्वाही त्यांनी हजारोंच्या साक्षीने दिली.
विरोधकावर हल्लाबोल..
त्याचवेळी त्यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. राष्ट्रवादी आणि काँग्रेसने काही समाजकंटकांना, दलालांना हाताशी धरून आमच्या विरोधात गरळ ओकायला लावली आहे. त्यांनी हे लक्षात ठेवावे – हे षडयंत्र थांबलं नाही तर 2029 च्या निवडणुकीत टांगा पलटी करून घोडे फरार केल्याशिवाय हा स्वाभिमानी मातंग समाज गप्प बसणार नाही. या, असं खुलं आव्हान त्यांनी दिलं.
एकच मागणी, एकच निर्धार  
उपवर्गीकरण आरक्षण ही एकमेव मागणी घेऊन सुरू झालेला हा लढा आता महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात पोहोचला आहे. रस्त्यावरची ही लढाई न्याय मिळेपर्यंत अधिक तीव्र होईल, असा इशारा राजेश घोडे यांनी दिला आहे. या मोर्चाने एक गोष्ट स्पष्ट केली. राजेश घोडे हे आता केवळ मातंग समाजाचे नाहीत, तर राज्यातील समस्त वंचित-दलितांचे बुलंद नेतृत्व म्हणून समोर आले आहेत. त्यांच्या या एल्गाराने मंत्रालयापासून दिल्लीपर्यंत धडकी भरवली आहे.

COMMENTS