गुवाहाटी: मुसळधार पावसामुळे आसाममधील पूरपरिस्थिती दिवसेंदिवस अधिक गंभीर होत असून राज्यभरातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. राज्य आपत्ती व्यव

गुवाहाटी: मुसळधार पावसामुळे आसाममधील पूरपरिस्थिती दिवसेंदिवस अधिक गंभीर होत असून राज्यभरातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अहवालानुसार, एकाच दिवसात दहा जणांचा मृत्यू झाल्याने पूरबळींची एकूण संख्या ४४ वर पोहोचली आहे. अनेक नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत असल्याने आणखी जिल्ह्यांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
बुहरीदिहिंग, दिहो, धनसिरी, कुशियरा आणि दिसंग या प्रमुख नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली असून त्यांच्या काठांवरील भागांना पुराचा सर्वाधिक फटका बसला आहे. मुख्यमंत्री डॉ. हिमंत बिस्वा शर्मा यांनी शिवसागर, चराईदेव आणि जोरहाट या सर्वाधिक प्रभावित जिल्ह्यांचा दौरा करून नागरिकांशी संवाद साधला. प्रशासनाकडून आवश्यक ती सर्व मदत तातडीने उपलब्ध करून दिली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. राज्य शासनातील मंत्री आणि लोकप्रतिनिधीही पूरग्रस्त भागांना भेटी देत असून मदत साहित्याचे वितरण सुरू आहे.
सध्या कारबी आंगलोंग, गोलाघाट, चराईदेव, कामरूप, शिवसागर, जोरहाट, डिब्रूगढ, नागाव, धेमाजी, होजाई आणि कामरूप महानगर अशा ११ जिल्ह्यांतील ४० महसूल विभागांमधील ९३९ गावे पुराच्या विळख्यात आहेत. पुरामुळे सुमारे ६ लाख ५३ हजारांहून अधिक नागरिक बाधित झाले असून जवळपास २४ हजार ८९७ हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे कृषी क्षेत्रालाही मोठा फटका बसला आहे.
पूरग्रस्तांसाठी राज्य शासनाने १०६ निवारा शिबिरे आणि ३८१ मदत वितरण केंद्र सुरू केली असून एकूण ४८७ ठिकाणी मदतकार्य सुरू आहे. सध्या २४ हजार ४१८ नागरिक निवारा शिबिरांमध्ये राहत आहेत, तर सुमारे २ लाख ९० हजारांहून अधिक नागरिकांना मदत केंद्रांमार्फत अन्नधान्य व जीवनावश्यक साहित्य पुरवले जात आहे.
२२ जुलै रोजी कारबी आंगलोंगमध्ये एक, चराईदेवमध्ये दोन, शिवसागरमध्ये तीन, जोरहाटमध्ये तीन आणि धेमाजीमध्ये एक अशा दहा जणांचा मृत्यू झाला. शिवसागर जिल्ह्यात सहा जण बेपत्ता असल्याची नोंद असून त्यांचा शोध सुरू आहे. पुरामुळे पशुधनाचेही मोठे नुकसान झाले आहे. १ लाख ३८ हजार ९६५ जनावरे बाधित झाली असून त्यात मोठी व लहान जनावरे तसेच कुक्कुटपालनातील पक्षांचाही समावेश आहे. पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने १०७ जनावरांचा मृत्यू झाला आहे.

COMMENTS