Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रुपयाच्या घसरणीवरून लोकसभेत खडाजंगी; देशाची आर्थिक स्थिती मजबूत, वित्तीय तूट नियंत्रणात : अर्थमंत्री सीतारामन

नवी दिल्ली : डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या घसरणीच्या मुद्द्यावरून सोमवारी लोकसभेत जोरदार गदारोळ झाला. विरोधकांनी केंद्र सरकारवर टीका करत रुपयाच्या सत

राहुरी पोटनिवडणुकीसाठी 103 उमेदवारी अर्जांची खरेदी
जम्प रोप राष्ट्रीय स्पर्धेत पार्थ भिंगारेला सुवर्णपदक
अचूक पंचनामे करून अहवाल सादर करा; पालकमंत्री विखेंकडून नुकसानीची पाहणी; प्रशासनास निर्देश

नवी दिल्ली : डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या घसरणीच्या मुद्द्यावरून सोमवारी लोकसभेत जोरदार गदारोळ झाला. विरोधकांनी केंद्र सरकारवर टीका करत रुपयाच्या सततच्या घसरणीबाबत प्रश्‍न उपस्थित केले, तर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सरकारची भूमिका स्पष्ट करत अर्थव्यवस्थेची स्थिती भक्कम असल्याचे सांगितले. अर्थमंत्री म्हणाल्या की, भारतीय रुपया इतर उदयोन्मुख अर्थव्यवस्थांच्या तुलनेत तुलनेने चांगली कामगिरी करत आहे. देशाची आर्थिक घडी मजबूत असून वित्तीय तूट नियंत्रणात आहे आणि परकीय चलन साठाही समाधानकारक आहे, असे त्यांनी नमूद केले.
यावेळी समाजवादी पक्षाचे खासदार धर्मेंद्र यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेचा संदर्भ देत रुपयाच्या घसरणीवरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. संपूर्ण देश पंतप्रधानांचे ऐकतो, मात्र रुपयाचे मूल्य सातत्याने कमी होत असल्याने जनतेत नाराजी वाढत असल्याचा आरोप त्यांनी केला. रुपया परकीय चलनांच्या तुलनेत मजबूत कधी होणार, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. यावर उत्तर देताना अर्थमंत्री सीतारामन यांनी अलीकडील एका जागतिक सर्वेक्षणाचा उल्लेख करत पंतप्रधान मोदी हे जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेते असल्याचे सांगितले. विरोधकांच्या घोषणाबाजीदरम्यान उत्तर ऐकून घेण्याचे आवाहनही त्यांनी केले. तसेच, लोकसभेत दिवाळखोरी व नादारी प्रक्रियेतील सुधारणा करणार्‍या विधेयकावरही चर्चा झाली. या विधेयकामुळे देशातील दिवाळखोरी प्रक्रिया अधिक सक्षम होईल, असा विश्‍वास अर्थमंत्र्यांनी व्यक्त केला. 2016 पासून मिळालेल्या अनुभवांचा विचार करूनच सुधारित तरतुदी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. राज्यसभेत केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री के. राममोहन नायडू यांनी आपत्कालीन परिस्थितीत विमानाच्या लँडिंगसंदर्भातील नियम स्पष्ट केले. सुरक्षितता हा सर्वोच्च निकष असून हवामान, विमानाचा प्रकार आणि हवाई क्षेत्रातील परिस्थिती लक्षात घेऊन निर्णय घेतला जातो, असे त्यांनी नमूद केले. एव्हिएशन इंधनाचा साठा सध्या पुरेसा असून पुढील साठ दिवसांसाठी उपलब्धता असल्याची माहितीही त्यांनी दिली.


रिझर्व्ह बँकेच्या हस्तक्षेपही ठरला अपयशी
अलीकडच्या काळात सातत्याने दबावाखाली असलेल्या भारतीय रुपयाला दिलासा मिळेल असं वाटत असतांनाच रूपयाने पुन्हा एकदा घसरण नोंदवली. आंतरबँक परकीय चलन बाजारात सोमवारी रुपया प्रति डॉलर 93.59 या पातळीवर उघडला आणि सुरुवातीलाच त्यात तब्बल 1.22 रुपयांची वाढ नोंदली गेली. गेल्या आठवड्यातील अखेरीस रुपया प्रति डॉलर 94.85 या ऐतिहासिक नीचांकी पातळीपर्यंत घसरला होता. सोमवारी सकाळच्या व्यवहारात रुपयाने आणखी बळ मिळवत प्रति डॉलर 93.55 पर्यंत मजल मारली. नीचांकी पातळीवरून सुमारे 1.30 रुपयांची ही सुधारणा बाजारासाठी सकारात्मक संकेत औट घटकेची ठरली असून रूपया 95.22 च्या पातळीवर आला आहे.

COMMENTS