मुंबई : राज्यातील नाशिक धर्मांतर, परतवाडा लैंगिक शोषण, खरात प्रकरण तसेच मुंबईतील गोरेगाव ड्रग्ज प्रकरणांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनि

मुंबई : राज्यातील नाशिक धर्मांतर, परतवाडा लैंगिक शोषण, खरात प्रकरण तसेच मुंबईतील गोरेगाव ड्रग्ज प्रकरणांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी गृह विभागाच्या बैठकीत सविस्तर आढावा घेत तपास अधिक प्रभावी व निष्पक्ष करण्याचे निर्देश पोलिस अधिकाऱ्यांना दिले. धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नयेत, अशा स्पष्ट सूचनाही त्यांनी यावेळी केल्याची माहिती सूत्रांनी दिली. या बैठकीला राज्याचे पोलिस महासंचालक, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव, एसआयटी प्रमुख तसेच वरिष्ठ पोलिस अधिकारी उपस्थित होते.
नाशिकमधील धर्मांतराच्या प्रकरणावर बोलताना, धर्मांतरासारखे प्रकार अजिबात खपवून घेऊ नका, असे स्पष्ट आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. हे प्रकरण स्वतःहून उजेडात आणल्याबद्दल नाशिक पोलिसांचे त्यांनी कौतुक केले. मात्र, आता तपास तितकाच दमदार व्हावा, यात असणाऱ्या सर्व पॅटर्नचा तपास करा, कोणताही मुद्दा तपासातून सुटू नये, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे सूत्रांनी सांगितले.
परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणात पीडितांना तक्रार देण्यासाठी विश्वास देणे आवश्यक असल्याचे सांगत, त्यासाठी समुपदेशनाची मदत घेण्याच्या सूचना केल्या. संबंधित समाजसेवकांचा सहभाग वाढवून पीडितांना आधार देण्यावर त्यांनी भर दिला.
खरात प्रकरणात पीडितांचा विश्वास जिंकणे सर्वात महत्त्वाचे असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. या प्रकरणात दोषी कोणीही असो, त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे, यासाठी भक्कम पुरावे गोळा करण्याचे आदेश त्यांनी दिले. न्यायालयात खटला मजबूत होण्यासाठी तपासाची दिशा ठोस ठेवावी आणि अपराधसिद्धी हा केंद्रबिंदू असावा, असे त्यांनी सांगितले.
मुंबई ड्रग्ज प्रकरणात कारवाईची व्याप्ती वाढवा
गोरेगाव ड्रग्ज प्रकरणात दोन तरुणांचा मृत्यू झाल्याने हे प्रकरण मुख्यमंत्र्यांनी गांभीर्याने घेतले आहे. या पार्श्वभूमीवर राज्यभर ड्रग्जविरोधात मोठ्या प्रमाणात कारवाया करण्याचे आदेश त्यांनी दिले. तरुणाईच्या भविष्याशी निगडित हा गंभीर मुद्दा असल्याने अशा प्रकरणांकडे अत्यंत गांभीर्याने पाहावे, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

COMMENTS