Homeताज्या बातम्या

माळेगाव येथे नैसर्गिक शेती शाळेत शेतकर्‍यांना मार्गदर्शन; सोयाबीन पिकासाठी विषमुक्त शेतीचा संदेश

बीड: महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानांतर्गत केज तालुक्यातील माळेगाव येथे सोयाबीन पि

शासनाच्या योजना शेवटपर्यंत पोहोचवणे हेच पुण्याचे कार्य; माजी आ. स्नेहलता कोल्हे यांचे कोपरगावमधील मेळाव्यात प्रतिपादन
कर्मयोगी आबासाहेब काकडे हे देशव्यापी व्यक्तिमत्व: डॉ. पुरुषोत्तम भापकर
सालेवडगावमध्ये कृषीदूतांचे उत्साहात स्वागत

बीड: महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानांतर्गत केज तालुक्यातील माळेगाव येथे सोयाबीन पिकावरील नैसर्गिक शेती शाळेचे आयोजन करण्यात आले. या माध्यमातून शेतकर्‍यांना विषमुक्त आणि पर्यावरणपूरक शेतीकडे वळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

नैसर्गिक शेतीमुळे उत्पादन खर्च कमी होण्यास मदत होते, जमिनीचे आरोग्य व सुपीकता वाढते तसेच शाश्वत शेतीला चालना मिळते, असे यावेळी कृषी विभागाच्या अधिकार्‍यांनी सांगितले. या शेती शाळेत शेतकर्‍यांना प्रत्यक्ष शेतावर प्रशिक्षण देण्यात आले. यामध्ये बीजप्रक्रिया, जीवामृत, घनामृत, बीजामृत, निमास्त्र, दशपर्णी अर्क, निबोळी अर्क तयार करण्याची पद्धत तसेच त्यांचा वापर याबाबत प्रात्यक्षिकांसह माहिती देण्यात आली. हिरवळीचे खत, पिकांची फेरपालट, सेंद्रिय कर्ब वाढविणे आणि रासायनिक खते व कीटकनाशकांचा मर्यादित वापर याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा आत्मा प्रकल्प संचालक सुभाष साळवे यांच्या संकल्पनेतून व आत्मा प्रकल्प उपसंचालक सुरज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली केज तालुक्यात विविध खरीप पिकांसाठी नैसर्गिक शेती शाळा राबविण्यात येत आहेत. तालुका कृषी अधिकारी सागर पठाडे यांच्या नियोजनातून माळेगाव येथे सोयाबीन पिकाची नैसर्गिक शेती शाळा घेण्यात आली. या उपक्रमासाठी २५ शेतकर्‍यांची निवड करण्यात आली असून आत्मा प्रकल्पामार्फत पीक प्रात्यक्षिकासाठी सोयाबीन बियाणे, बीजप्रक्रिया संघ तसेच बीबीएफ तंत्रज्ञानाच्या वापरासाठी अनुदान उपलब्ध करून देण्यात येत आहे.

शेती शाळेत सोयाबीन बियाण्यावर ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया करण्याचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. तसेच रायझोबियम, पीएसबी व केएमबी या घटकांचा समावेश असलेल्या महाजैविक जिवाणू संघाचा वापर करण्याबाबत शेतकर्‍यांना सविस्तर माहिती देण्यात आली. कार्यक्रमास आत्माचे योगेश पाटील, सहाय्यक कृषी अधिकारी कमलाकर राऊत, कालिदास गव्हाणे, यशवंत दोडके, शरद दोडके, बालाजी गव्हाणे, आशामती लोकरे, ज्योती लोकरे, गोविंद दोडके, बळीराम लोकरे, दीपक दोडके तसेच कृषिभूषण शेतकरी गटाचे सदस्य व परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नैसर्गिक शेतीबाबत शेतकर्‍यांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी अशा प्रकारच्या शेती शाळा उपयुक्त ठरत असल्याची भावना उपस्थित शेतकर्‍यांनी व्यक्त केली.

COMMENTS