Homeताज्या बातम्या

’सेटिंगच्या राजकारणातून शेतकरी व जनतेची फसवणूक’;  आ.प्रताप पाटील चिखलीकरांवर प्रा. मनोहर धोंडे यांची टीका

नांदेड : शिवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे यांनी लोहा-कंधार मतदारसंघाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्यावर विविध राजकीय मुद्द्या

मोफत आरोग्य तपासणी सप्ताहाचे आयोजनश्री स्वामी समर्थ सेवा मार्गाच्या सद्गुरू प.पू. मोरेदादा चॅरिटेबल हॉस्पिटलचा उपक्रम
आ. विजय राजे पंडित यांच्या नेतृत्वाखाली फारूख पटेल यांनी पटेल नगर भागाची पाण्याची समस्या दूर केली :- शेख युनूस
यमुना नदीत बोट उलटून दहा जणांचा मृत्यू


नांदेड : शिवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे यांनी लोहा-कंधार मतदारसंघाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्यावर विविध राजकीय मुद्द्यांवरून जोरदार टीका केली. नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी एमएलसी निवडणूक, जिल्हा परिषद, जिल्हा मध्यवर्ती बँक आणि स्थानिक राजकारणातील कथित ’सेटिंग’वर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
प्रा. धोंडे म्हणाले की, एमएलसी निवडणुकीपासून जिल्हा परिषद, जिल्हा मध्यवर्ती बँक आणि इतर राजकीय घडामोडींमध्ये कोणत्या पद्धतीने तडजोडी आणि ’सेटिंग’ करण्यात आल्या, याची चर्चा जनतेत उघडपणे होत आहे. त्यामुळे या विषयावर स्वतंत्रपणे बोलण्याची आवश्यकता नसल्याचे त्यांनी नमूद केले. महात्मा बसवेश्वर महाराजांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणाच्या मागणीसाठी शिवा संघटनेने आंदोलन छेडले असताना, सत्ताधार्‍यांनी या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोपही त्यांनी केला. या कामासाठी 15 ऑगस्टपर्यंतचा अल्टिमेटम देण्यात आला असून, त्यानंतर राज्यव्यापी आंदोलनाची भूमिका जाहीर करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. प्रा. धोंडे यांनी पुढे आरोप केला की, आ.प्रताप चिखलीकर यांनी ’मी नाही त्यातली, कडी लाव आतली’ अशी भूमिका घेत असले तरी नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेतील घडामोडी आणि कलंबर साखर कारखान्याच्या अधोगतीत त्यांची भूमिका काय होती, याचे उत्तर जनतेला मिळाले पाहिजे. त्यांनी असा दावाही केला की, सत्तेचा आणि पैशाचा प्रभाव वापरून राजकारण केले जात असून, सामान्य शेतकरी आणि नागरिकांचे प्रश्न मात्र दुर्लक्षित राहिले आहेत. लोहा-कंधार मतदारसंघात निवडून आल्यानंतर दोन वर्षांत विकासकामांबाबत अपेक्षित कामगिरी दिसून आली नसल्याचा आरोप करत, दुष्काळ, शेतकर्‍यांचे प्रश्न, निधीची कमतरता आणि स्थानिक विकास यावर आमदारांनी स्पष्ट भूमिका मांडावी, अशी मागणीही त्यांनी केली.  स्थानिक स्वराज्य संस्था आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकांमध्ये राजकीय तडजोडी झाल्याचा दावा करत, एकेकाळी परस्परांवर टीका करणारे नेते आता एकत्र आल्याचे चित्र दिसत असल्याची टीकाही त्यांनी केली. दरम्यान, नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत अनेक जागा बिनविरोध झाल्याच्या पार्श्वभूमीवर प्रा. धोंडे यांच्या या आरोपांमुळे जिल्ह्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे.

COMMENTS