माहूर तालुक्यातील पालाईगुडा फाटा ते कुपटी या राज्यमार्ग क्रमांक 51 वरील रस्त्याचे काम अत्यंत संथ गतीने सुरू असल्याने नागरिक व वाहनधारकांमध्ये तीव

माहूर तालुक्यातील पालाईगुडा फाटा ते कुपटी या राज्यमार्ग क्रमांक 51 वरील रस्त्याचे काम अत्यंत संथ गतीने सुरू असल्याने नागरिक व वाहनधारकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या 22 किलोमीटरच्या मार्गावर सुमारे 10 ते 12 पुलांचे बांधकाम अद्याप अपूर्ण असल्याने मुसळधार पाऊस झाल्यास अनेक ठिकाणी वाहतूक खंडित होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
पूर्वी जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे असलेला हा मार्ग राज्य मार्ग विभागाकडे वर्ग करण्यात आला. मात्र संबंधित विभागाचे कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथे असल्याने कामावर प्रभावी देखरेख नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. शेतकर्यांच्या जमिनी संपादित करूनही अनेकांना मोबदला न मिळाल्याने यापूर्वी रास्ता रोको आंदोलनही करण्यात आले होते. सध्या रस्त्यावर माती व मुरूम टाकण्यात आल्याने पावसाळ्यात चिखलाचे साम्राज्य निर्माण होत आहे. त्यामुळे दुचाकी घसरण्याच्या घटना घडण्याची भीती असून वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अनेक ठिकाणी पूल अपूर्ण असल्याने मोठ्या नाल्यांतील पाणी थेट शेतांमध्ये शिरून पिकांचे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सुमारे 70 ते 80 कोटी रुपयांच्या खर्चातून हा रस्ता विकसित केला जात असला तरी कामाचा वेग आणि गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. रस्ता उंच करण्याऐवजी खोदकाम केल्यामुळे पावसाचे पाणी साचण्याची शक्यता आहे. तसेच काही ठिकाणी मजबूत पुलांऐवजी लहान नळकांड्यांवर आधारित पूल उभारले जात असल्याने त्यांच्या टिकाऊपणावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. स्थानिक नागरिकांनी राज्य मार्ग बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांनी घटनास्थळी तळ ठोकून कामाची पाहणी करावी, शेतकर्यांना तातडीने मोबदला द्यावा आणि रस्ते व पुलांची कामे युद्धपातळीवर पूर्ण करावीत, अशी मागणी केली आहे. तसेच पावसाळ्यात कोणतीही दुर्घटना होण्यापूर्वी प्रशासनाने तातडीने लक्ष घालावे, अशी अपेक्षाही नागरिकांनी व्यक्त केली आहे.

COMMENTS