नवी दिल्ली : पेट्रोलमध्ये इथेनॉलचा वापर करण्याच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारला विरोधाचा सामना करावा लागत आहे. त्याचवेळी भाजप खासदाराच्या एका वक्त
नवी दिल्ली : पेट्रोलमध्ये इथेनॉलचा वापर करण्याच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारला विरोधाचा सामना करावा लागत आहे. त्याचवेळी भाजप खासदाराच्या एका वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. देशात शुद्ध पेट्रोलच (Pure Petrol) उपलब्ध नाही तर ते तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? असं वादग्रस्त वक्तव्य मध्य प्रदेशातील रीवाचे खासदार जनार्दन मिश्रा (Janardan Mishra) यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर आता टीकेची झोड उठवली जात आहे.
कोलकाता-रीवा-भोपाळ विमानसेवेच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात जनार्दन मिश्रा नागरिकांना संबोधित करत होते. त्यांच्या या भाषणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
भारत सर्वात कमी महागाई असलेला देश खासदार जनार्दन मिश्रा म्हणाले, “जगात आज सर्वात जास्त रोजगाराच्या संधी जर कुठे निर्माण होत असतील, तर तो भारत आहे. जगातील इतर देशांच्या तुलनेत आज भारतात सर्वात कमी महागाई आहे. देश आज आत्मनिर्भरतेच्या दिशेने वेगाने पुढे जात आहे. आपण 600 कोटी रुपयांचे लष्करी साहित्य, बॉम्ब निर्यात करत आहोत, तर 38 हजार कोटी रुपयांचे हवाई लष्करी साहित्य निर्यात करत आहोत.”
‘शुद्ध पेट्रोल तुझ्या बापाच्या घरून येईल का?’ इथेनॉल मिश्रणाच्या वादावर भाष्य करताना जनार्दन मिश्रा म्हणाले, “गॅस आणि इंधनाच्या बाबत बोलायचे झाले तर आपल्या देशात केवळ 20 टक्केच खनिज तेलाचे उत्पादन होते. उर्वरित 80 टक्के तेल आपल्याला परदेशातून आयात करावे लागते. सध्या आखाती देशांत युद्ध आणि तणाव सुरू असल्याने होर्मुझची सामुद्रधुनी बंद आहे. 18 हजार किलोमीटरचा प्रदीर्घ फेरा मारून देशात तेल पोहोचवले जात आहे.”
जनार्दन मिश्रा पुढे म्हणाले की, “अशा कठीण परिस्थितीत जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगतात की पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिसळावे लागेल, तेव्हा लोक रस्त्यावर उतरून आंदोलन करतात आणि इथेनॉल नको, फक्त शुद्ध पेट्रोल द्या अशी मागणी करतात. देशात शुद्ध पेट्रोल उपलब्धच नाही, तर ते कुठून आणणार? शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरून येईल का?”
“ब्राझीलमध्ये 100 टक्के इथेनॉलवर गाड्या धावतात” इथेनॉलच्या वापराचे समर्थन करताना भाजप खासदाराने ब्राझील देशाचे उदाहरण दिले. “आज देशात इथेनॉलला उगाच विरोध केला जात आहे. ब्राझीलमध्ये 100 टक्के इथेनॉल तयार केले जाते आणि तेथील संपूर्ण गाड्या इथेनॉलवर चालतात. भारतातील वाहनांमध्येही इथेनॉलवर चालण्याची पूर्ण क्षमता आहे, तरीही लोक इथेनॉल बनवण्याला विरोध करतात. जर आपण इथेनॉल बनवले नाही, तर पेट्रोल आणि डिझेल आणणार कुठून?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

COMMENTS