Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

यमुना नदीत बोट उलटून दहा जणांचा मृत्यू

वृंदावन : उत्तरप्रदेशातील वृंदावन येथे शुक्रवारी दुपारी यमुना नदीत झालेल्या भीषण अपघातात दहा जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण अद्याप बेपत्ता आहेत.

भरधाव बसची कंटेनरला धडक; 6 ठार .
वसईत स्कूटीवरील दोन भावांना कारने उडवले
आमदार दळवी यांच्या गाडीचा अपघात


वृंदावन : उत्तरप्रदेशातील वृंदावन येथे शुक्रवारी दुपारी यमुना नदीत झालेल्या भीषण अपघातात दहा जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण अद्याप बेपत्ता आहेत. पंजाब राज्यातील मुक्तसर येथून आलेल्या भाविकांनी भरलेली बोट असंतुलित होऊन उलटल्याने ही दुर्घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे बत्तीस भाविक सकाळी वृंदावन येथे दाखल झाले होते. त्यांनी निधिवनाचे दर्शन घेतल्यानंतर यमुना नदीत फिरण्यासाठी बोटीतून प्रवास सुरू केला. केशीघाट परिसरातून ही बोट निघाली होती. मात्र प्रवासादरम्यान बोट नियंत्रणाबाहेर गेल्याने ती पुलाला धडकली आणि क्षणात उलटली. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, नदीवरील पीपांच्या पुलाजवळ ही धडक झाली. धडक बसताच बोटीत असलेले सर्व प्रवासी पाण्यात पडले. काहींना पोहता येत नसल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली. अपघातानंतर तातडीने स्थानिक प्रशासन, पोलीस आणि पाणबुडे घटनास्थळी दाखल झाले. बचावकार्य वेगाने सुरू करण्यात आले. आतापर्यंत दहा जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून सुमारे दहा जणांना सुरक्षित वाचवण्यात यश आले आहे. उर्वरित प्रवाशांचा शोध सुरू असून नदीत व्यापक शोधमोहीम राबवली जात आहे. घटनेनंतर परिसरात मोठी गर्दी झाली असून भीती आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. जखमी आणि वाचवलेल्या भाविकांना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे. या घटनेमुळे वृंदावन परिसरात शोककळा पसरली असून नदीतील सुरक्षाव्यवस्थेबाबत प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले जात आहे. प्रशासनाकडून अपघाताच्या कारणांचा सखोल तपास सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.

COMMENTS