अहिल्यानगर : आकाशवाणीच्या स्थापनेला ९० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने देशभर ‘आकाशवाणी @ 90’ हा विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्

अहिल्यानगर : आकाशवाणीच्या स्थापनेला ९० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने देशभर ‘आकाशवाणी @ 90’ हा विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र व युवान, अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित निबंध लेखन स्पर्धा रविवारी उत्साहात पार पडली.
जैन बोर्डिंग येथील युवान वसतिगृहात या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. “आकाशवाणीचे बदलते स्वरूप”, “राष्ट्र उभारणीत युवकांची भूमिका”, “कृत्रिम बुद्धिमत्ता आणि युवकांसमोरील आव्हाने” तसेच “समाजमाध्यमे आणि युवक” या विषयांवर स्पर्धकांनी आपले विचार लेखनाच्या माध्यमातून मांडले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी आकाशवाणीचे कार्यक्रम अधिकारी सुदाम बटुळे यांनी आकाशवाणीचे विविध कार्यक्रम तसेच ‘आकाशवाणी @ 90’ उपक्रमाची माहिती विद्यार्थ्यांना दिली. युवानचे संस्थापक संदीप कुसळकर यांनी आजच्या युगात आकाशवाणी सारख्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचा युवकांना कसा फायदा होतो, याबाबत मार्गदर्शन केले.
स्पर्धेतील उत्कृष्ट निबंधांची निवड परीक्षकांनी केली. यात अक्षता दत्तात्रय वडवणीकर हिने प्रथम क्रमांक पटकावला, तर आरती ज्ञानदेव आरगडे हिला द्वितीय आणि सुरज सुरेश चव्हाण याला तृतीय क्रमांक मिळाला. गौरी रविंद्र लहामगे व मंगेश दत्तात्रय गुंजाळ यांनी उत्तेजनार्थ बक्षिसे मिळवली.
या उपक्रमाचे विद्यार्थ्यांनी स्वागत करत आकाशवाणीशी अधिक जोडले जाण्याची भावना व्यक्त केली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अतुल सातपुते, वृषाली घनवट, मीना जाधव, श्रेयस लहामगे, चेतन औटे आदींनी परिश्रम घेतले.

COMMENTS