मुस्लिम समाजासाठी पूर्वी लागू असलेले पाच टक्के आरक्षण रद्द करण्यात आल्याच्या निषेधार्थ येत्या 17 एप्रिल रोजी बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य एल

मुस्लिम समाजासाठी पूर्वी लागू असलेले पाच टक्के आरक्षण रद्द करण्यात आल्याच्या निषेधार्थ येत्या 17 एप्रिल रोजी बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य एल्गार मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चामध्ये गेवराई तालुक्यातील मुस्लिम समाजबांधवांनी हजारोंच्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते अलीम सय्यद यांनी केले आहे.
या मोर्चाची सुरुवात बीड शहरातील जामा मशिद येथून होणार असून, जिल्हाधिकारी कार्यालयावर त्याची सांगता होणार आहे. अलीम सय्यद यांनी सांगितले की, शिक्षण, नोकरी आणि सामाजिक विकासासाठी आरक्षण हे अत्यंत महत्त्वाचे साधन आहे. राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयामुळे मुस्लिम समाजाच्या शैक्षणिक व आर्थिक प्रगतीवर परिणाम होत असल्याने हा निर्णय तातडीने मागे घेण्याची गरज आहे. या पार्श्वभूमीवर गेवराई तालुक्यात विविध ठिकाणी बैठका घेऊन जनजागृती मोहीम राबवली जात आहे. युवक, विद्यार्थी, व्यापारी तसेच सर्व स्तरातील नागरिकांनी या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपला हक्क व मागण्या शांततेच्या मार्गाने मांडाव्यात, असेही त्यांनी स्पष्ट केले. मोर्चाच्या यशस्वी आयोजनासाठी तालुक्यातील कार्यकर्ते सज्ज झाले असून, मोठ्या उपस्थितीद्वारे शासनाचे लक्ष वेधून घेण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे.

COMMENTS