विद्यार्थी कोणत्याही राजकीय वादाचा विषय नसावा!

Homeताज्या बातम्या

विद्यार्थी कोणत्याही राजकीय वादाचा विषय नसावा!

देशातील लाखो तरुणांसाठी शिक्षण ही केवळ पदवी मिळवण्याची प्रक्रिया नसून त्यांच्या आयुष्याला दिशा देणारे स्वप्न असते. वर्षानुवर्षांचा अभ्यास, रात्रं

पत्रकारावर हल्ला आणि समाज माध्यमातून मतभेद! 
माध्यान्ह भोजनातून विषबाधा, कॅग कडाडले!
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची परखडता ! 
The current image has no alternative text. The file name is: dakhal-2-1-1.png

देशातील लाखो तरुणांसाठी शिक्षण ही केवळ पदवी मिळवण्याची प्रक्रिया नसून त्यांच्या आयुष्याला दिशा देणारे स्वप्न असते. वर्षानुवर्षांचा अभ्यास, रात्रंदिवस केलेली मेहनत, पालकांनी घेतलेले कर्ज आणि भवितव्याबद्दलच्या आशा या सर्व गोष्टी एका स्पर्धा परीक्षेभोवती गुंफलेल्या असतात. अशा वेळी प्रश्नपत्रिका फुटल्याच्या बातम्या समोर येतात, तेव्हा फक्त परीक्षा रद्द होत नाही, तर लाखो विद्यार्थ्यांच्या विश्वासालाही मोठा तडा जातो.

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दावा केला आहे की, गेल्या १० वर्षांत देशात तब्बल १५२ प्रश्नपत्रिका फुटीच्या घटना घडल्या आहेत. म्हणजेच सरासरी दर महिन्याला एक पेपरफुटी झाली आहे. या प्रकरणांमध्ये अद्याप एकाही दोषीला प्रभावी शिक्षा झालेली नाही, असा आरोप करत या घटनांमुळे साडेसात कोटी विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबीयांवर गंभीर परिणाम झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. या आकड्यांवर राजकीय मतभेद असू शकतील; मात्र पेपरफुटीची प्रत्येक घटना विद्यार्थ्यांच्या आयुष्यावर गंभीर परिणाम करते, ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही.

कष्टकरी पालकांची स्वप्ने अन् विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य

छोट्या गावांत राहणारे, आर्थिक परिस्थिती बेताची असणारे विद्यार्थी सण-उत्सव आणि मनोरंजनाचा त्याग करून अभ्यासाला प्राधान्य देतात. आई-वडील शेतमजुरी किंवा छोटा व्यवसाय करून क्लासची फी आणि प्रवासाचा खर्च उचलतात. मात्र परीक्षा होण्यापूर्वी किंवा नंतर पेपरफुटीची बातमी समोर आल्यावर या सर्व मेहनतीवर पाणी फिरते. पुन्हा परीक्षा देणे, मानसिक ताण सहन करणे आणि वयोमर्यादा संपणे अशा अनेक समस्यांचा सामना विद्यार्थ्यांना करावा लागतो.

याचा सर्वात मोठा परिणाम विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासावर आणि मानसिक आरोग्यावर होतो. “मेहनत करूनही न्याय मिळणार नाही” अशी भावना निर्माण झाल्यास संपूर्ण शिक्षण व्यवस्थेची विश्वासार्हता धोक्यात येते. नैराश्य आणि भविष्याबद्दलची अनिश्चितता यामुळे अनेक तरुण खचून जातात, तर पालकांची आर्थिक गुंतवणूक आणि आशा एका क्षणात धूसर होतात.

कठोर कारवाई अन् पारदर्शकतेची गरज

शिक्षण व्यवस्था हा राष्ट्राचा कणा आहे. प्रश्नपत्रिका तयार करण्यापासून ते परीक्षा पार पाडण्यापर्यंत प्रत्येक टप्प्यावर पारदर्शकता, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, कठोर सुरक्षा व्यवस्था आणि दोषींवर तातडीने कारवाई होणे अत्यंत आवश्यक आहे. दोषींना कठोर शिक्षा झाल्याचा संदेश समाजात गेला तरच प्रामाणिक विद्यार्थ्यांचा विश्वास पुन्हा निर्माण होऊ शकतो.

विद्यार्थी हा कोणत्याही राजकीय वादाचा विषय नसावा; तो देशाच्या भविष्याचा शिल्पकार आहे. तरुणांना त्यांच्या कर्तृत्वावर संधी मिळाली पाहिजे, भ्रष्टाचाराच्या बळावर नव्हे. विद्यार्थ्यांना केवळ सहानुभूतीची नाही, तर न्यायाची गरज आहे. एका विद्यार्थ्याचे स्वप्न तुटते तेव्हा केवळ एका व्यक्तीचे नाही, तर देशाच्या भविष्याचाच एक तुकडा तुटतो, याचे भान सर्वांनी ठेवणे गरजेचे आहे.

COMMENTS