बीड : जिल्ह्यातील दिव्यांग कर्मचारी व व्यक्तींच्या विविध प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलत जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांन

बीड : जिल्ह्यातील दिव्यांग कर्मचारी व व्यक्तींच्या विविध प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलत जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी बारा कलमी कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसंदर्भात ऐतिहासिक निर्देश जारी केले आहेत.
दि. 23 एप्रिल 2026 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात शासन मान्यताप्राप्त महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटनेच्या पदाधिकार्यांसमवेत ही महत्त्वाची बैठक पार पडली. संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष अशोक आठवले यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकार्यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. बैठकीच्या प्रारंभी भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करून जिल्हाधिकार्यांचा सन्मान करण्यात आला. संघटनेतर्फे सादर करण्यात आलेल्या बारा कलमी कार्यक्रमात 4 टक्के आरक्षणाची पूर्ण अंमलबजावणी, पदोन्नतीत दिव्यांगांना न्याय, सुगम्य भारत अभियानाची काटेकोर अंमलबजावणी, सोयीच्या ठिकाणी बदली, विशेष आर्थिक सहाय्य, तक्रार निवारण यंत्रणा, स्वयंरोजगारासाठी जागा व अर्थसहाय्य, आरोग्य सुविधा, तसेच शिक्षण व कौशल्य विकास यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांचा समावेश होता. या सर्व मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेत जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी जिल्ह्यातील सर्व विभागप्रमुखांना तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. तसेच प्रत्येक मुद्द्यावर लवकरात लवकर कार्यपूर्ती अहवाल सादर करण्याचे आदेश देत दिव्यांगांच्या प्रश्नांकडे संवेदनशीलतेने पाहण्याचे आवाहन केले. या बैठकीस संघटनेचे जिल्हाध्यक्ष अजिनाथ हाडुळे, सचिव दिनेश गाडे, तसेच श्यामसुंदर दासरे, शेख बिबन, शेख इसुब, बाळासाहेब कांबळे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकार्यांच्या या निर्णयामुळे जिल्ह्यातील दिव्यांग कर्मचारी व नागरिकांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीस गती मिळणार असल्याचा विश्वास संघटनेच्या पदाधिकार्यांनी व्यक्त केला आहे.

COMMENTS