Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

खत टंचाई व काळा बाजार रोखण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांची धडक तपासणी

नांदेड : खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात खतांचा सुरळीत पुरवठा व शेतकर्‍यांना योग्य दरात उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल

बीड कृषी प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण ‘सरडा’ म्हणजे शेतकर्‍यांची क्रूर थट्टा!सरकार सरडे पालनासाठी अनुदान देणार काय? – डॉ. गणेश ढवळे
राहाता तालुक्यात पिक विमा परताव्यात दुजाभाव? मच्छिंद्र चौधरी; शिर्डी, राहाता, पुणतांबा मंडळातील शेतकरी प्रतीक्षेत
बोगसगिरीला चाप! व्यापार्‍यांचे धाबे दणाणले; ज्वारी-मका खरेदीत ’केराम पॅटर्न’चा दणका

नांदेड : खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात खतांचा सुरळीत पुरवठा व शेतकर्‍यांना योग्य दरात उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी नांदेड शहरातील नवीन मोंढा परिसरात कृषी सेवा केंद्रांवर अचानक धडक तपासणी केली.
यावेळी त्यांनी वसुंधरा फर्टीलायझर्स तसेच श्री फर्टीलायझर्स या कृषी निविष्ठा विक्री केंद्रांना भेट देत खत साठा, विक्री प्रक्रिया आणि गोदामांची पाहणी केली. विक्रेत्यांचे परवाने, साठा नोंदवही (रजिस्टर) आणि ई-पॉस मशीनची तपासणी करून प्रत्यक्ष साठा आणि नोंदी यांची पडताळणी करण्यात आली. जिल्हाधिकार्‍यांनी स्पष्ट निर्देश दिले की, ई-पॉस मशीनशिवाय खत विक्री करू नये आणि कोणत्याही प्रकारची साठेबाजी होऊ देऊ नये. युरिया व डीएपी खतांच्या विक्रीबाबत जिल्ह्यातील सर्व कृषी केंद्रांची खरीपपूर्व 100 टक्के तपासणी पूर्ण करण्याच्या सूचना कृषी विभागाला देण्यात आल्या. तसेच प्रत्येक दुकानाच्या दर्शनी भागात आवश्यक माहितीचे फलक लावण्याचे आदेशही देण्यात आले. तपासणीदरम्यान ई-पॉसवरील अहवाल, साठा नोंदवही आणि प्रत्यक्ष भौतिक साठा यांची जुळवणी करण्यात आली. विक्री केलेल्या खतांच्या बिलांची तपासणी करून संबंधित शेतकर्‍यांनी प्रत्यक्ष खरेदी केली आहे का याची खातरजमा करण्यात आली. शेतकर्‍यांना दर्जेदार व योग्य दरात कृषी निविष्ठा मिळत आहेत का याची प्रत्यक्ष पाहणी करत जिल्हाधिकार्‍यांनी कडक इशारा दिला की, कृत्रिम टंचाई निर्माण करणे, साठा लपवणे, लिकींग पद्धतीने विक्री करणे किंवा काळा बाजार केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल. अशा प्रकरणांमध्ये संबंधितांचे परवाने तात्काळ निलंबित करण्यासोबतच दंडात्मक कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. बनावट व निकृष्ट दर्जाच्या कृषी निविष्ठांविरोधात ‘शून्य सहनशीलता’ धोरण राबविण्याचे निर्देश देत कृषी विभागाने गुणवत्ता नियंत्रणासाठी सर्वतोपरी उपाययोजना कराव्यात, असेही त्यांनी सांगितले. या तपासणीवेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत, कृषी विकास अधिकारी अनिलकुमार ऐतवाडे, विभागीय तंत्र अधिकारी बालाजी मुंडे, मोहीम अधिकारी सचिन कपाळे, जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षक अमोल पेकम, तालुका गुणनियंत्रण निरीक्षक श्रीमती पुनम चातरमल तसेच आरसीएफ व इफकोचे जिल्हा प्रतिनिधी उपस्थित होते.

COMMENTS