संगमनेर : अहिल्यानगर जिल्ह्यात विविध तालुक्यांना कोट्यवधी रुपयांचा पीकविमा मंजूर झाला असताना संगमनेर तालुक्याला एक रुपयाही मदत मिळाली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. विद्यमान सत्ताधाऱ्यांनी संगमनेरच्या शेतकऱ्यांशी अन्याय करत राजकीय डाव खेळल्याची टीका किसान काँग्रेसचे अध्यक्ष आनंद वर्पे यांनी केली आहे. पीकविम्यासंदर्भात प्रसिद्धीपत्रकाद्वारे बोलताना आनंद वर्पे तसेच तालुक्यातील विविध शेतकऱ्यांनी सांगितले की, संगमनेर तालुका हा क्षेत्रफळाने मोठा असून तालुक्यात पठार भाग, प्रवरा भाग आणि तळेगाव पट्टा असे विविध भौगोलिक भाग आहेत. लोकनेते तथा माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांना कायम मदत मिळत होती. मात्र मागील दीड वर्षांपासून बदललेल्या राजकीय परिस्थितीनंतर तालुक्यावरील अन्याय वाढल्याचा आरोप त्यांनी केला. सध्याचे लोकप्रतिनिधी व पालकमंत्री केवळ जाहिरातबाजी आणि सोशल मीडियावरील प्रसिद्धीत व्यस्त असून प्रत्यक्षात कोणतीही विकासकामे सुरू नसल्याचा आरोपही त्यांनी केला. शेतकऱ्यांना मदत मिळत नसताना धार्मिकता आणि जातीयतेच्या नावावर राजकारण सुरू असल्याची टीकाही त्यांनी केली. दरम्यान, वाढत्या उन्हामुळे तालुक्यातील काही गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. काकडवाडी परिसरात टँकर सुरू करून त्याची सोशल मीडियावर प्रसिद्धी करण्यात आली, मात्र नंतर टँकर बंद करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. याउलट राजहंस दूध संघाने पठार भागातील वाड्यांवर पाणीपुरवठा करून शेतकऱ्यांना दिलासा दिल्याचे त्यांनी नमूद केले. संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांवर सातत्याने अन्याय होत असून पीकविम्यात शून्य मदत मिळणे ही शेतकऱ्यांची क्रूर थट्टा असल्याची भावना व्यक्त करण्यात आली. यापुढील काळात तालुक्यातील तमाम शेतकऱ्यांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे. चौकट कोठे किती पीकविमा? अहिल्यानगर जिल्ह्यात ११८ कोटी रुपयांचा पीकविमा मंजूर करण्यात आला. त्यामध्ये राहता तालुक्याला १३ कोटी, कोपरगावला ९ कोटी, अकोलेला १ कोटी, श्रीरामपूरला १७ कोटी तर राहुरीला ६ कोटी रुपयांची मदत मिळाली. मात्र संगमनेर तालुक्याला एक रुपयाही पीकविमा मंजूर करण्यात आला नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचे वर्पे यांनी म्हटले आहे.

संगमनेर : अहिल्यानगर जिल्ह्यात विविध तालुक्यांना कोट्यवधी रुपयांचा पीकविमा मंजूर झाला असताना संगमनेर तालुक्याला एक रुपयाही मदत मिळाली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. विद्यमान सत्ताधाऱ्यांनी संगमनेरच्या शेतकऱ्यांशी अन्याय करत राजकीय डाव खेळल्याची टीका किसान काँग्रेसचे अध्यक्ष आनंद वर्पे यांनी केली आहे.
पीकविम्यासंदर्भात प्रसिद्धीपत्रकाद्वारे बोलताना आनंद वर्पे तसेच तालुक्यातील विविध शेतकऱ्यांनी सांगितले की, संगमनेर तालुका हा क्षेत्रफळाने मोठा असून तालुक्यात पठार भाग, प्रवरा भाग आणि तळेगाव पट्टा असे विविध भौगोलिक भाग आहेत. लोकनेते तथा माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांना कायम मदत मिळत होती. मात्र मागील दीड वर्षांपासून बदललेल्या राजकीय परिस्थितीनंतर तालुक्यावरील अन्याय वाढल्याचा आरोप त्यांनी केला.
सध्याचे लोकप्रतिनिधी व पालकमंत्री केवळ जाहिरातबाजी आणि सोशल मीडियावरील प्रसिद्धीत व्यस्त असून प्रत्यक्षात कोणतीही विकासकामे सुरू नसल्याचा आरोपही त्यांनी केला. शेतकऱ्यांना मदत मिळत नसताना धार्मिकता आणि जातीयतेच्या नावावर राजकारण सुरू असल्याची टीकाही त्यांनी केली.
दरम्यान, वाढत्या उन्हामुळे तालुक्यातील काही गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. काकडवाडी परिसरात टँकर सुरू करून त्याची सोशल मीडियावर प्रसिद्धी करण्यात आली, मात्र नंतर टँकर बंद करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. याउलट राजहंस दूध संघाने पठार भागातील वाड्यांवर पाणीपुरवठा करून शेतकऱ्यांना दिलासा दिल्याचे त्यांनी नमूद केले.
संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांवर सातत्याने अन्याय होत असून पीकविम्यात शून्य मदत मिळणे ही शेतकऱ्यांची क्रूर थट्टा असल्याची भावना व्यक्त करण्यात आली. यापुढील काळात तालुक्यातील तमाम शेतकऱ्यांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे.
चौकट
कोठे किती पीकविमा?
अहिल्यानगर जिल्ह्यात ११८ कोटी रुपयांचा पीकविमा मंजूर करण्यात आला. त्यामध्ये राहता तालुक्याला १३ कोटी, कोपरगावला ९ कोटी, अकोलेला १ कोटी, श्रीरामपूरला १७ कोटी तर राहुरीला ६ कोटी रुपयांची मदत मिळाली. मात्र संगमनेर तालुक्याला एक रुपयाही पीकविमा मंजूर करण्यात आला नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचे वर्पे यांनी म्हटले आहे.

COMMENTS