बीड तालुक्यातील पिंपळनेर येथे तातडीने अप्पर तहसील कार्यालय सुरू करण्यात यावे, अशी मागणी शेतकरी हक्क मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकार्यांकडे निवेदनाद

बीड तालुक्यातील पिंपळनेर येथे तातडीने अप्पर तहसील कार्यालय सुरू करण्यात यावे, अशी मागणी शेतकरी हक्क मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकार्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. दि. 25 जून रोजी सादर करण्यात आलेल्या या निवेदनात पिंपळनेर परिसरातील नागरिकांना शासकीय कामांसाठी होणार्या गैरसोयींचा उल्लेख करण्यात आला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, बीड तालुका भौगोलिकदृष्ट्या मोठा असून अनेक गावे जिल्हा मुख्यालयापासून 40 ते 45 किलोमीटर अंतरावर आहेत. त्यामुळे उत्पन्नाचे दाखले, जात प्रमाणपत्र, जमीनविषयक कामे आणि इतर महसुली कामांसाठी नागरिकांना वारंवार बीड शहरात जावे लागते. यामध्ये वेळ, पैसा आणि श्रम यांचा मोठा अपव्यय होत असल्याने सर्वसामान्य, शेतकरी आणि कष्टकरी नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पिंपळनेर परिसरात सुमारे 35 ते 40 गावांचा समावेश होत असून हा भाग लोकसंख्या आणि बाजारपेठेच्या दृष्टीनेही महत्त्वाचा आहे. अनेक वर्षांपासून या भागातील नागरिकांची स्वतंत्र तालुका निर्मितीची मागणी प्रलंबित आहे. त्यासाठी विविधवेळी आंदोलने आणि निवेदने देण्यात आली असली तरी शासनाकडून अद्याप कोणताही सकारात्मक निर्णय झालेला नाही. या पार्श्वभूमीवर किमान अप्पर तहसील कार्यालय सुरू करून नागरिकांची शासकीय कामे स्थानिक पातळीवर, कमी खर्चात आणि वेळेत पूर्ण होण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी शेतकरी हक्क मोर्चाने केली आहे. यावेळी शेतकरी हक्क मोर्चाचे राजेंद्र आमटे, प्रदीप घुमरे, बळीराम मेहत्रे, चंद्रकांत थोटे, समाधान जमाले, हनुमान घोडके, विठ्ठल ढोकणे, किशोर मुंडे, अशोक काशीद यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

COMMENTS