Homeताज्या बातम्या

पिंपळनेरच्या भीमज्योत बुद्ध विहारात ‘बुद्ध प्रबोधन’ सोहळा उत्साहात

पिंपळनेर : बीड तालुक्यातील पिंपळनेर येथील भीमज्योतनगर बुद्ध विहारात वर्षावास प्रारंभाच्या पवित्र औचित्यावर ‘बुद्ध प्रबोधन’ सोहळ्याचे आयोजन उत्साह

नागपुरात भाडेकरूने घरमालकावर केला तलवारीने हल्ला; पाहुणी म्हणून आलेल्या महिलेचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर
नीट पेपर लीकप्रकरणी बिहार बंद दरम्यान हिंसाचार; सीवानमध्ये दगडफेकीत एसपी जखमी, तेजप्रताप यादव पोलिसांच्या ताब्यात
वर्षभर दडपलेली फाईल अखेर उघडली; सुनील मोरे प्रकरणात मुख्याध्यापक पवळे यांच्यावर विभागीय चौकशी

पिंपळनेर : बीड तालुक्यातील पिंपळनेर येथील भीमज्योतनगर बुद्ध विहारात वर्षावास प्रारंभाच्या पवित्र औचित्यावर ‘बुद्ध प्रबोधन’ सोहळ्याचे आयोजन उत्साहपूर्ण आणि मंगलमय वातावरणात करण्यात आले. 3 ऑगस्ट रोजी झालेल्या या कार्यक्रमास परिसरातील उपासक-उपासिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. बुद्धवंदना, प्रबोधन आणि अन्नदानाच्या माध्यमातून संपूर्ण परिसरात धम्ममय वातावरण निर्माण झाले होते.

पिंपळनेर येथे वर्षावास प्रारंभानिमित्त धार्मिक वातावरणात आयोजन 3 ऑगस्ट रोजी करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या प्रारंभी महामानव तथागत गौतम बुद्ध आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित उपासक-उपासिकांनी सामूहिक बुद्धवंदना घेतली. बुद्धवंदनेच्या मंगलमय वातावरणाने कार्यक्रमाला आध्यात्मिक उंची प्राप्त झाली. कार्यक्रमाचे मुख्य प्रबोधन चैत्यभूमी भिक्षू संघाचे राष्ट्रीय सचिव भन्ते डॉ. सुमित यांनी केले. आपल्या अभ्यासपूर्ण मार्गदर्शनातून त्यांनी तथागत गौतम बुद्धांचे जीवनकार्य, धम्मचक्क पवर्तन आणि बुद्धांच्या विचारांचे मानवी जीवनातील महत्त्व यावर सविस्तर प्रकाश टाकला. यावेळी पुढे बोलताना त्यांनी तथागत गौतम बुद्धांनी सारनाथ येथे कौंडिण्य, वप्पा, भद्दिय, अश्वजीत आणि महानाम या पाच परिव्राजकांना चार आर्यसत्य आणि आर्य अष्टांगिक मार्गाचा उपदेश देत धम्मचक्क पवर्तन केले, असे सांगून भन्ते डॉ. सुमित यांनी बुद्धांच्या धम्मातील विवेक, करुणा आणि प्रज्ञेचा संदेश स्पष्ट केला. समाजातून अंधश्रद्धा दूर करून वैज्ञानिक दृष्टिकोन, समता, बंधुता आणि मानवतावादी मूल्यांची जोपासना करणे काळाची गरज आहे, असेही त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून अधोरेखित केले. तसेच विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथातील विचार आणि तत्त्वज्ञान आचरणात आणण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले. या बुद्ध प्रबोधन सोहळ्यास भन्ते डॉ. सुमित (राष्ट्रीय सचिव, चैत्यभूमी भिक्षू संघ), राजेंद्र ससाने (तालुका अध्यक्ष, द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया), अरुणाताई निसर्ग (जिल्हाध्यक्ष, महिला आघाडी, द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया), व्ही. एन. निसर्गंध सर (वरिष्ठ केंद्रीय शिक्षक) यांच्यासह जाधव ताई, वंदनाताई, शितलताई, वसमिकताई तसेच विविध पदाधिकारी, उपासक-उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सिरसट परिवाराकडून श्रद्धेने अन्नदान बुद्ध प्रबोधन कार्यक्रमानंतर उपस्थित उपासक-उपासिकांसाठी सिरसट परिवाराच्या वतीने श्रद्धापूर्वक भोजनदानाचा कार्यक्रम घेण्यात आला. या अन्नदानामुळे कार्यक्रमाला सामाजिक बांधिलकीची जोड मिळाली. वर्षावास प्रारंभानिमित्त आयोजित या बुद्ध प्रबोधन सोहळ्यामुळे पिंपळनेर व परिसरातील बौद्ध समाजामध्ये धम्मविचारांची नवचैतन्यपूर्ण ऊर्जा निर्माण झाली. बुद्धांच्या समता, करुणा, प्रज्ञा आणि मानवतेच्या विचारांचा जागर करण्याचा संदेश देत हा सोहळा उत्साहात संपन्न झाला.

COMMENTS