बीड : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यभर राबविण्यात येत असलेली विशेष संक्षिप्त पुनरीक्षण मोहीम (एसआयआर) आता अंतिम टप्प्यात पोहोचली असून

बीड : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यभर राबविण्यात येत असलेली विशेष संक्षिप्त पुनरीक्षण मोहीम (एसआयआर) आता अंतिम टप्प्यात पोहोचली असून बीड तालुक्यातही या मोहिमेला वेग आला आहे. मतदार यादी अधिक अचूक, अद्ययावत आणि पारदर्शक करण्याच्या उद्देशाने महसूल प्रशासनाकडून विशेष नियोजन करून कामकाज सुरू आहे.
अधिकारी, कर्मचारी, बीएलओ तसेच नागरिकांच्या सक्रिय सहभागामुळे मोहिमेच्या कामाला मोठी गती मिळाली आहे. मतदार यादीतील त्रुटी दूर करणे, नवीन पात्र मतदारांची नोंदणी करणे तसेच आवश्यक दुरुस्त्या करण्यासाठी प्रशासनाकडून मतदान केंद्रनिहाय कार्यवाही करण्यात येत आहे. ५ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार, बीड तालुक्यातील एकूण ४ लाख ३६ हजार ५६७ मतदारांपैकी ४ लाख २९ हजार ६६५ गणना पत्रांचे वितरण पूर्ण झाले आहे. याची टक्केवारी ९८.४२ टक्के इतकी आहे. तसेच ३ लाख ४७ हजार ५२५ गणना पत्रांचे डिजिटायझेशन पूर्ण झाले असून एकूण प्रगती ९३.५२ टक्क्यांवर पोहोचली आहे. बीड विधानसभा मतदारसंघातही या मोहिमेची ९२.९२ टक्के प्रगती नोंदविण्यात आली आहे.
विशेष पुनरीक्षण मोहिमेच्या अनुषंगाने राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी, विभागीय आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मनोज घोडे, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी आणि उपविभागीय अधिकारी कविता जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली बीड तालुक्यात नियोजनबद्ध पद्धतीने काम सुरू आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर बीएलओमार्फत नागरिकांशी थेट संपर्क साधला जात असून गणना पत्रांचे वितरण, भरलेली माहिती तपासणे, आवश्यक कागदपत्रांची पडताळणी आणि डिजिटायझेशनची प्रक्रिया पूर्ण केली जात आहे.
बीडचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी शहरातील विविध मतदान केंद्रांना भेटी देऊन प्रत्यक्ष कामकाजाची पाहणी केली. यावेळी सहायक महसूल अधिकारी श्रीराम वायभट यांच्यासह संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी मतदान केंद्रांवरील उपलब्ध नोंदी, गणना पत्रांचे वितरण, नागरिकांचा सहभाग, डिजिटायझेशनची स्थिती आणि प्रलंबित कामांचा आढावा घेण्यात आला. कामात अचूकता राखून कोणताही पात्र मतदार मतदार यादीपासून वंचित राहणार नाही, याची विशेष खबरदारी घेण्याच्या सूचना तहसीलदार शेळके यांनी दिल्या.
मतदान केंद्रांवर बीएलओ सारिका चौहान तसेच समाजसेवक सय्यद एजाज अली यांनी नागरिकांना गणना पत्र भरण्याची प्रक्रिया समजावून सांगितली. नागरिकांच्या विविध शंकांचे निरसन करून आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली. त्यामुळे अनेक मतदारांनी केंद्रावरच आपली प्रक्रिया पूर्ण केली.
तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी सांगितले की, विशेष संक्षिप्त पुनरीक्षण मोहीम ही केवळ निवडणूक प्रक्रिया नसून लोकशाही अधिक मजबूत करण्यासाठीचे महत्त्वपूर्ण अभियान आहे. प्रत्येक पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत अचूक असणे आवश्यक आहे. त्यामुळे ज्या नागरिकांनी अद्याप गणना पत्र सादर केलेले नाही किंवा माहिती अद्ययावत केलेली नाही, त्यांनी तातडीने प्रक्रिया पूर्ण करावी. तसेच नागरिकांनी बीएलओंना सहकार्य करून मतदार यादी अधिक अचूक व त्रुटीमुक्त करण्यासाठी सहभाग नोंदवावा, असे आवाहन त्यांनी केले.
या मोहिमेला नागरिकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे. उपस्थित नागरिकांनी प्रशासनाच्या नियोजनबद्ध कामकाजाचे कौतुक केले. यावेळी समाजसेवक सय्यद एजाज अली, अझहर मोमीन, शेख इम्रान, सय्यद आसिफ अली, सय्यद माजीद जमा, नबील जमा यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.
विशेष पुनरीक्षण मोहिमेच्या अंतिम टप्प्यात प्रत्येक मतदान केंद्रावर अधिकारी आणि बीएलओ उपलब्ध असून नागरिकांना आवश्यक मदत केली जात आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत बीएलओ किंवा महसूल प्रशासनाशी संपर्क साधून आपली प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. सर्व पात्र नागरिकांची नावे मतदार यादीत अचूकपणे समाविष्ट करून लोकशाही प्रक्रिया अधिक सक्षम करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.

COMMENTS