मुंबई : राज्यातील बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने निर्णायक भूमिका घेतली असून, दोन्ही मतदारसंघांत उमेदवार उ

मुंबई : राज्यातील बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने निर्णायक भूमिका घेतली असून, दोन्ही मतदारसंघांत उमेदवार उभे करण्याचा ठाम निर्णय पक्षाने घेतला आहे. या निर्णयामुळे राज्याच्या राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली असून, विशेषतः बारामतीतील लढत अधिक चुरशीची होण्याचे संकेत मिळत आहेत.
काँग्रेसकडून बारामतीत सुनेत्रा पवार यांच्या विरोधात उमेदवार देण्याचा निर्णय जवळपास निश्चित झाला आहे. या संदर्भात प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पक्षश्रेष्ठींशी चर्चा करूनच अंतिम निर्णय घेतला जात असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांनी सांगितले की, बारामती मतदारसंघासाठी सहा इच्छुकांनी अर्ज केले असून, त्यांच्या मुलाखतीही पूर्ण झाल्या आहेत. उमेदवार निवडीची प्रक्रिया अत्यंत काळजीपूर्वक राबवली जात आहे. राहुरी मतदारसंघातही काँग्रेसकडून उमेदवार निश्चिती अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. या ठिकाणी चार इच्छुकांनी अर्ज सादर केले असून, स्थानिक पातळीवरील राजकीय समीकरणांचा सखोल विचार करून उमेदवाराची निवड केली जाणार आहे. दोन्ही मतदारसंघांतील निवडणुकीसाठी पक्षाने स्वतंत्र रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. महाविकास आघाडीतील समन्वय लक्षात घेऊनच उमेदवारांची घोषणा केली जाणार असल्याची माहितीही समोर आली आहे. मित्रपक्षांशी सल्लामसलत करून अंतिम निर्णय जाहीर केला जाईल, असे काँग्रेस नेतृत्वाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे जागावाटप आणि आघाडीतील राजकीय समन्वय या मुद्द्यांवरही पुढील काही दिवसांत स्पष्टता येण्याची शक्यता आहे. हर्षवर्धन सपकाळ यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, येत्या दोन दिवसांत उमेदवारांची अधिकृत घोषणा करण्यात येईल. आज दिवसभरात उमेदवार निवड प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता असून, त्यानंतर पक्षाची अधिकृत भूमिका जाहीर केली जाईल.

COMMENTS