Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राहात्यात आजही रंगतो ‘गळी लागण्याचा’ थरार! हवेत लटकत ‘गळवंती’ ला लावली जातात लहान मुले;  शेकडो वर्षांच्या परंपरेचे जतन

राहाता : परंपरा म्हणजे केवळ रूढी नाहीत, तर त्या असतात भावनांची, श्रद्धेची आणि नात्यांची जपलेली साखळी… अशाच एका अनोख्या आणि थरारक परंपरेचा अनुभव र

सोलर योजनेत शेतकऱ्याची फसवणूक
स्थापना दिवस समितीच्या संयोजकपदी ढोकरीकर
कोकणवाडी येथे बाल भैरवनाथ यात्रोत्सव उत्साहात

राहाता : परंपरा म्हणजे केवळ रूढी नाहीत, तर त्या असतात भावनांची, श्रद्धेची आणि नात्यांची जपलेली साखळी… अशाच एका अनोख्या आणि थरारक परंपरेचा अनुभव राहाता येथील श्री वीरभद्र महाराजांच्या यात्रेत पाहायला मिळतो, ही परंपरा म्हणजे ‘गळी लागण्याची’ परंपरा! शेकडो वर्षांपासून ही परंपरा येथे जपली जातेय..

राहाता शहराचे ग्रामदैवत श्री वीरभद्र महाराजांच्या यात्रा उत्सवाला यंदाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ट्रस्टच्या वतीने उत्कृष्ट नियोजन करण्यात आले होते. या यात्रेत सुमारे १६०० महिला व ४०० पुरुषांनी गळी लागून नवस फेडण्याचा संकल्प केल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष जबाजी मेचे यांनी दिली.

 या यात्रेचे मुख्य आकर्षण म्हणजे ‘गळवंती रथ’ आणि त्यासोबत जोडलेली ‘गळी लागण्याची’ परंपरा. ज्यांनी नवस केलेला असतो, ते भाविक या रथाला गळी लागून—म्हणजेच स्वतःला बांधून—आपली नवसपूर्ती करतात. हजारो वर्षांपासून चालत आलेली ही परंपरा आजही तितक्याच श्रद्धेने आणि निष्ठेने जपली जाते. भाविकांच्या मते, “विरभद्र महाराज नवसाला पावतात,” आणि म्हणूनच इच्छापूर्ती झाल्यानंतर गळी लागून नवस फेडणे ही एक पवित्र जबाबदारी मानली जाते. भाविकांनी नवस केलेला असतो. या गळवंतीला रथाला नवसाचे मुले गळी लावण्याची हजारो वर्षाची परंपरा आहे.

 या यात्रेत हत्तीच्या प्रतिकृतीचा भव्य रथ तयार केला जातो. या रथाच्या दोन्ही बाजूंना भाविक गळी लागून फेरी पूर्ण करतात. यंदा हजारो महिला-पुरुषांनी यात सहभाग घेतला. विशेष म्हणजे उच्चशिक्षित तरुणींचा मोठा सहभाग या परंपरेची बदलत्या काळातील स्वीकारार्हता दर्शवतो.

  या यात्रेची सुरुवात श्री हनुमान जन्मोत्सवाने होत असून, श्री नवनाथ (मायंबा) यात्रा गुरुवारी, २ एप्रिल रोजी संपन्न झाली. त्यानंतर ३ एप्रिल रोजी पहाटेपासून अभिषेक, आरती व सत्यनारायण महापूजेसह धार्मिक कार्यक्रम पार पडले. गळवंती रथापुढे गगनचुंबी सारस काठ्या नाचवल्या जातात, गुलाल व भंडाऱ्यांची उधळण होते आणि ‘बोल बिरोबा की जय… वीरभद्र महाराज की जय…’ चा जयघोष वातावरण भारून टाकतो. डफाच्या तालावर खेळले जाणारे पारंपरिक खेळ यात्रेला वेगळीच रंगत आणतात.

 यात्रेदरम्यान मंदिरासमोर शेरणी (गुळ) व पेढ्यांचा प्रसाद वाटप केले जाते. यात्रा सुरू होण्यापूर्वी आठ दिवस गावकऱ्यांना व पाहुण्यांना भोजन देण्याची परंपरा आजही कायम आहे. २ एप्रिल ते ११ एप्रिलदरम्यान सुरू असलेल्या या उत्सवात जंगी कुस्त्या, बैलगाडा शर्यती, लावणी कार्यक्रम यांसह विविध सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ११ एप्रिल रोजी ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख यांच्या कीर्तनाने उत्सवाची सांगता होणार आहे.

कच्च्या घागरीवर चालून वर्षभराचे भाकीत !

कच्च्या घागरीवर चालून वर्षभराची भविष्यवाणी वर्तवण्याची अनोखी परंपरा आहे. येथे कच्च्या घागरीवर चालून वीरभद्र मंदिराचे पुजारी सोमनाथ भगत यांनी वर्षभरामध्ये होणाऱ्या घडामोडींवर भाकीत केले. यामध्ये रोहिणीचा पाऊस तुरळक ठिकाणी होईल, मृग नक्षत्र आणि आर्द्रा नक्षत्रात पाऊस चांगला होईल हत्ती नक्षत्र, उत्तरा नक्षत्रात नंदी हालतील, खरीप आणि रब्बी हंगाम समाधानकारक होईल असे भाकीत यावेळी वर्तण्यात आले.

COMMENTS