Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मालदा हिंसाचारातील सूत्रधाराला अटक; तपास यंत्रणांनी विमानतळावरून घेतले ताब्यात

मालदा हिंसाचारातील सूत्रधाराला अटक नवी दिल्ली : पश्‍चिम बंगालमधील मालदा येथे निवडणूक निरीक्षकांना ओलीस ठेवल्याच्या गंभीर प्रकरणात तपास यंत

जम्प रोप राष्ट्रीय स्पर्धेत पार्थ भिंगारेला सुवर्णपदक
मच्छिंद्र चाकणे यांचा सत्कार
नांदेडमध्ये अवैध सावकारीचा पर्दाफाश; कर्जदारांना डांबून खंडणी मागणार्‍या टोळीतील 5 जण अटकेत

मालदा हिंसाचारातील सूत्रधाराला अटक

नवी दिल्ली : पश्‍चिम बंगालमधील मालदा येथे निवडणूक निरीक्षकांना ओलीस ठेवल्याच्या गंभीर प्रकरणात तपास यंत्रणांनी मोठी कारवाई करत मुख्य सूत्रधाराला शुक्रवारी अटक केली आहे. या घटनेमुळे राज्यातील कायदा-सुव्यवस्था आणि निवडणूक प्रक्रियेच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्‍न निर्माण झाले असून प्रकरण आता राष्ट्रीय तपास पातळीवर पोहोचले आहे.
मालदा हिंसाचार प्रकरणातील प्रमुख आरोपी मोफक्करुल इस्लाम याला बागडोगरा विमानतळावरून ताब्यात घेण्यात आले. तो देशाबाहेर किंवा अन्य ठिकाणी पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती तपास यंत्रणांना मिळाली होती. तत्काळ कारवाई करत त्याला अटक करण्यात आली. इस्लाम हा व्यावसायिक वकील असून पूर्वी निवडणूक राजकारणातही सक्रिय होता, अशी माहिती समोर आली आहे. 1 एप्रिल रोजी सुजापूर परिसरात झालेल्या आंदोलनादरम्यान इस्लामने जमावाला भडकावणारी भाषणे केली, असा प्राथमिक आरोप आहे. या भाषणांनंतरच परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आणि मोठा जमाव एकत्र येऊन प्रशासनाला लक्ष्य करण्यात आले. कालियाचक-2 ब्लॉक विकास कार्यालयाबाहेर हजारो आंदोलक जमा झाले होते. आंदोलकांनी कार्यालयाचे प्रवेशद्वार बंद करून आत असलेल्या निवडणूक निरीक्षकांना बाहेर पडू दिले नाही. सुमारे सात ते नऊ तास अधिकारी अडकून पडले होते. या काळात त्यांना अन्न-पाणीही मिळाले नसल्याचे समोर आले आहे. घटनेच्या दुसर्‍या दिवशीही मालदा आणि आसपासच्या जिल्ह्यांमध्ये आंदोलनाची तीव्रता कायम राहिली. नारायणपूर भागात सीमा सुरक्षा दलाच्या छावणीसमोर मोठी गर्दी जमली. राष्ट्रीय महामार्ग अडवण्यात आला, टायर जाळण्यात आले आणि काही ठिकाणी जाळपोळ व तोडफोडीच्या घटना घडल्या. जलपाईगुडी, कूचबिहार आणि पुरबा बर्धमान या जिल्ह्यांमध्येही निदर्शने झाली. या सर्व भागांमध्ये लवकरच मतदान होणार असल्याने परिस्थिती अधिक संवेदनशील मानली जात आहे. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत अनेकांना अटक केली आहे. एका राजकीय पक्षाच्या उमेदवारासह काही प्रमुख व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. अटक झालेल्या काहींनी आपल्यावरचे आरोप फेटाळत राजकीय हेतूने कारवाई होत असल्याचा दावा केला आहे.


राष्ट्रीय तपास यंत्रणा मैदानात
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तपास राष्ट्रीय स्तरावर सोपवण्यात आला आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेची विशेष पथके राज्यात दाखल होत असून संपूर्ण कटकारस्थान, निधीचा स्रोत आणि संघटित स्वरूपातील सहभाग यांचा तपास केला जाणार आहे. प्राथमिक अहवाल थेट सर्वोच्च न्यायालयासमोर सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.


सुनियोजित कट : ममता बॅॅनर्जी
पश्‍चिम बंगालमध्ये 23 आणि 29 एप्रिल रोजी होणार्‍या विधानसभा निवडणुकांपूर्वी राजकीय वातावरण तापले आहे. दरम्यान, शुक्रवारी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भारतीय जनता पक्षावर गंभीर आरोप केले. मालदामध्ये अलीकडे घडलेली घटना ही राज्यात अस्थिरता निर्माण करण्यासाठी रचलेली सुनियोजित कटकारस्थान असल्याचा आरोप त्यांनी केला. या घटनेसाठी बाहेरून लोकांना आणण्यात आल्याचा दावा त्यांनी केला.

COMMENTS