बीड :येत्या 17 एप्रिल रोजी आयोजित मुस्लिम आरक्षण मोर्चाला महाराष्ट्र मुस्लिम आरक्षण संघर्ष समिती व लोकसेना संघटना यांच्याकडून सशर्त पाठिंबा जाहीर

बीड :येत्या 17 एप्रिल रोजी आयोजित मुस्लिम आरक्षण मोर्चाला महाराष्ट्र मुस्लिम आरक्षण संघर्ष समिती व लोकसेना संघटना यांच्याकडून सशर्त पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे. समितीचे जिल्हाध्यक्ष तथा लोकसेना संघटनेचे प्रमुख ड. प्रा. इलियास इनामदार यांनी ही माहिती देत, बीड जिल्ह्यातील मुस्लिम समाजासह सर्व आरक्षणप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
इनामदार यांनी स्पष्ट केले की, हे आंदोलन मागण्या मान्य होईपर्यंत सातत्याने सुरू राहणे आवश्यक आहे. भूतकाळात काही नेत्यांनी समाजाची दिशाभूल करून आंदोलनाचा राजकीय फायदा घेतल्याचे उदाहरण देत त्यांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले. तसेच, मोर्चा आयोजकांची राजकीय पार्श्वभूमी व भूमिका स्पष्ट व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली. संयोजक कोणत्या पक्षाशी संबंधित आहेत किंवा कोणत्या नेत्यांशी जोडलेले आहेत, याबाबत समाजात चर्चा सुरू आहे. त्यामुळे त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, अन्यथा समाजात गैरसमज निर्माण होऊ शकतो, असे ते म्हणाले. मुस्लिम आरक्षणाचा लढा हा कोणत्याही एका व्यक्तीची मक्तेदारी नसून, समाजाच्या हक्कासाठी चालणारे आंदोलन असल्याचे त्यांनी नमूद केले. स्वतःच्या पूर्वीच्या आंदोलनातील सहभागाचा उल्लेख करत, त्यांनी सांगितले की समाजहितासाठी कोणत्याही पक्षाचा त्याग करण्याची तयारी त्यांनी यापूर्वी दाखवली आहे. आजच्या काही कार्यकर्त्यांमध्ये आंदोलनाचे राजकारण करून वैयक्तिक लाभ मिळवण्याची प्रवृत्ती वाढत असल्याची टीकाही त्यांनी केली. समाजाच्या भावनांचा वापर करून पद, तिकीट किंवा अन्य लाभ मिळवण्याचे प्रकार झाले, तर समाज ते कधीही माफ करणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. दरम्यान, सर्व अटींसह त्यांनी या मोर्चात स्वतः व त्यांच्या कार्यकर्त्यांसह सहभागी होणार असल्याचे सांगितले. तसेच, समाजाने मोठ्या संख्येने सहभागी होऊन शासनावर दबाव निर्माण करावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

COMMENTS