नवी दिल्ली : पश्चिम आशियातील भू-राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर विविध ठिकाणी अडकलेल्या ४,०५२ भारतीय खलाशांना सुरक्षितपणे भारतात परत आणण्यात यश आल्

नवी दिल्ली : पश्चिम आशियातील भू-राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर विविध ठिकाणी अडकलेल्या ४,०५२ भारतीय खलाशांना सुरक्षितपणे भारतात परत आणण्यात यश आल्याची माहिती केंद्रीय बंदरे, जहाजवाहतूक आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी दिली. या संपूर्ण मोहिमेचा आढावा घेण्यासाठी त्यांनी मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली.
बैठकीत पश्चिम आशियासह इतर संवेदनशील भागातील भारतीय सागरी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा सविस्तर आढावा घेण्यात आला. या संकटाच्या काळात परदेशात अडकलेल्या भारतीय खलाशांना टप्प्याटप्प्याने मायदेशी परत आणण्यात आले असून, त्यासाठी विविध यंत्रणांनी समन्वयाने काम केल्याचे सोनोवाल यांनी सांगितले. मायदेशी परतलेल्या खलाशांच्या पुनर्वसनासाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. त्यामध्ये वैद्यकीय उपचार, समुपदेशन, आवश्यक शासकीय मदत तसेच प्रभावित कुटुंबांशी सातत्याने संपर्क ठेवण्याचे काम सागरी प्रशासनाकडून सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली.
संकटात मृत्यू झालेल्या खलाशांच्या कुटुंबियांसाठी विशेष उच्च-जोखीम क्षेत्र योजनेअंतर्गत १० लाख रुपयांची तातडीची आर्थिक मदत देण्याची व्यवस्था करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या सहाय्यामुळे प्रभावित कुटुंबांना त्वरित दिलासा मिळावा, हा सरकारचा उद्देश असल्याचे त्यांनी नमूद केले. भारतीय खलाशी जागतिक सागरी क्षेत्रातील महत्त्वाचा घटक असून त्यांच्या सुरक्षिततेला केंद्र सरकार सर्वोच्च प्राधान्य देत आहे, असे सोनोवाल यांनी सांगितले. कोणत्याही आणीबाणीच्या परिस्थितीत भारतीय नागरिक आणि त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे राहील, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

COMMENTS