ढाका : बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी भारतातून घेतलेल्या आभासी पत्रकार परिषदेनंतर बांगलादेशातील राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे. या
ढाका : बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी भारतातून घेतलेल्या आभासी पत्रकार परिषदेनंतर बांगलादेशातील राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे. या प्रकरणावर बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्रालयाने तीव्र नाराजी व्यक्त करत, अशा घटनांमुळे भारत आणि बांगलादेश यांच्यातील संबंध सुधारण्याच्या प्रयत्नांना धक्का बसू शकतो, असे मत नोंदवले आहे. मात्र, भारताने या कार्यक्रमाशी सरकारचा कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे.
बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शेख हसीना यांनी नवी दिल्लीतून माध्यमांशी संवाद साधल्याबद्दल गंभीर आक्षेप आहे. मंत्रालयाच्या मते, विविध गंभीर आरोपांना सामोरे जाणाऱ्या आणि सध्या देशाबाहेर असलेल्या माजी मुख्यमंत्र्यांना अशा प्रकारे सार्वजनिक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले. या संवादात त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बांगलादेश व येथील जनतेबाबत आक्षेपार्ह विधान केली, असा आरोपही करण्यात आला.
मंत्रालयाने पुढे म्हटले की, या कार्यक्रमामुळे द्विपक्षीय संबंधांवर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता असल्याची माहिती भारत सरकारला आधीच देण्यात आली होती. तरीही हा कार्यक्रम पार पडल्याबद्दल खेद व्यक्त करण्यात आला आहे. तथापि, बांगलादेशने भारताशी मैत्रीपूर्ण आणि परस्पर हितसंबंधांवर आधारित संबंध कायम ठेवण्याची भूमिका पुन्हा अधोरेखित केली. सार्वभौम समानता, परस्पर आदर, अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप न करणे आणि राष्ट्रीय सन्मान या तत्त्वांच्या आधारावर दोन्ही देशांतील संबंध अधिक दृढ व्हावेत, अशी अपेक्षा मंत्रालयाने व्यक्त केली.
भारताने यापूर्वीच या प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. शेख हसीना यांचा माध्यमांशी झालेला संवाद हा एका खाजगी वृत्तसंस्थेने आयोजित केला होता. या कार्यक्रमाच्या आयोजनात किंवा प्रसारणात भारत सरकारचा कोणताही सहभाग नसल्याचे भारताने स्पष्ट केले आहे. शेख हसीना ५ ऑगस्ट २०२४ रोजी ढाका सोडून भारतात आल्या असून त्या सध्या भारतात वास्तव्यास आहेत. आभासी पत्रकार परिषदेत त्यांनी आपण कोणत्याही परिस्थितीत मायदेशी परतणार असल्याचे सांगितले. मला तुरुंगवास किंवा जीविताला धोका निर्माण होण्याची शक्यता याची जाणीव आहे. तरीही मी माझ्या देशातील जनतेसोबत राहण्यासाठी बांगलादेशात परतणार, असे त्यांनी नमूद केले. अवामी लीगच्या नेत्या शेख हसीना यांनी भारताचे आभार व्यक्त करत, भारत हा बांगलादेशचा दीर्घकाळचा विश्वासू मित्र राहिल्याचे सांगितले. तसेच, आपला उद्देश सत्तेत पुनरागमन नसून बांगलादेशला विकास, धर्मनिरपेक्षता आणि समृद्धीच्या मार्गावर पुन्हा नेण्याचा असल्याचा दावा त्यांनी केला.

COMMENTS